नवी दिल्ली, 9 डिसेंबर : येत्या 1 जानेवारीपासून यूपीआय ट्रान्झेक्शन (UPI transaction) महागणार असल्याचा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. तसंच थर्ड पार्टी अॅप्सद्वारे पेमेंट केल्यावरही अतिरिक्त चार्ज लागणार असंही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमुळे यूपीआय ट्रान्झेक्शनद्वारे पेमेंट करणाऱ्या अनेक युजर्समध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण आहे. परंतु याची सत्यता पडताळणी करण्यात आली असून याबाबत योग्य खुलासा करण्यात आला आहे. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) या बातमीची पडताळणी केली आहे. या पडताळणीमध्ये ही बाब खोटी असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. PIB Fact Check ने NPCI च्या ट्विटला रिट्विट करत, 1 जानेवारीपासून UPI Transaction महागणार, ही बाब असत्य असल्याचं स्पष्ट केलं आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) ट्विट करत, त्यांच्याकडून यूपीआय ट्रान्झेक्शन महाग केलं नसल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारे चार्ज वाढवण्याबाबत व्हायरल होणारी बाब खोटी असल्याचं NPCIने स्पष्ट केलं आहे.
तुम्हीही करू शकता फॅक्टचेक - जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना किंवा धोरणांबाबतच्या सत्यतेबद्दल संशय असल्यास, तुम्ही पीआयबी फॅक्ट चेककडे ते पाठवू शकता. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तसंच मेलद्वारेही पीआयबी फॅक्ट चेकशी संपर्क करू शकता. व्हाट्सअपवर 8799711259 या क्रमांकावर संपर्क करता येईल. त्याशिवाय ट्विटर @PIBFactCheck, फेसबुकवर PIBFactCheck आणि pibfactcheck@gmail.com ईमेलद्वारे संपर्क करू शकता.