जांभळ्या टोमॅटोची वैशिष्ट्यपूर्ण जात
मुंबई, 20 सप्टेंबर: झाडं किंवा वेलींवर येणारी फळं आणि भाज्या हा निसर्गाचा आविष्कार आहे. काही भाज्या अशा असतात, ज्यांचा वापर शाकाहारी (Vegetarian) आणि मांसहारी (Nonvegetarian) अशा सर्वच प्रकारच्या व्यक्ती रोजच्या आहारात करतात. टोमॅटो (Tomato) ही यापैकीच एक भाजी होय. टोमॅटोची भाजी, चटणी, कोशिंबीर, सूप असे विविध पदार्थ रोजच्या जेवणात समाविष्ट असतात. लहान मुलंदेखील आकर्षक रंगामुळे टोमॅटो आवडीनं खातात. लाल-हिरवे टोमॅटो दिसायला सुंदर असतात तशीच त्यांची चवदेखील उत्कृष्ट असते. हे टोमॅटो आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदेशीर असतात. शास्त्रज्ञांनी या टोमॅटोमध्ये जनुकीय बदल (Genetically Modified) करून आणखी चांगले टोमॅटो तयार केले आहेत. शास्त्रज्ञांनी लाल टोमॅटोऐवजी जांभळे टोमॅटो (Purple Tomato) तयार केले आहेत. या टोमॅटोचा वास आणि चव लाल टोमॅटोसारखीच आहे. जांभळा टोमॅटो हा लाल-हिरव्या टोमॅटोपेक्षा जास्त आरोग्यदायी (Healthy) असतो, असं ताज्या अभ्यासात म्हटलं आहे. जांभळे टोमॅटो दीर्घ काळ टिकतात. तसंच कॅन्सरसारख्या आजारांवरदेखील ते प्रभावी आहेत, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. पुढील वर्षी हे टोमॅटो बाजारात उपलब्ध होतील, असं सांगण्यात आलं आहे. आरोग्यदायी आहेत जांभळे टोमॅटो मिरर`च्या वृत्तानुसार, जांभळ्या रंगाचे टोमॅटो युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लियाच्या प्राध्यापक आणि ब्रिटिश बायोकेमिस्ट कॅथी मार्टिन यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने विकसित केले आहेत. ब्लॅकबेरी आणि ब्ल्यूबेरीप्रमाणे अँटीऑक्सिडंट्सचं ( Antioxidant) प्रमाण जास्त असलेल्या टोमॅटोची जात या टीमला डेव्हलप करायची होती. त्यांनी स्नॅपड्रॅगन फ्लॉवरची दोन जनुकं एकत्र करून टोमॅटोमध्ये एक विशेष घटक तयार केला. या टोमॅटोच्या उपयुक्ततेबाबत अभ्यासात असं आढळून आलं, की जेव्हा कॅन्सरग्रस्त उंदरांना जांभळे टोमॅटो खायला दिले तेव्हा ते सर्वसाधारण टोमॅटो खाणाऱ्यांपेक्षा 30 टक्के जास्त जगले. त्यावरून हा टोमॅटो कॅन्सर (Cancer) आणि डायबेटीस टाइप -2 (Diabetes Type-2) टाळण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटू लागला. अर्धा कप टोमॅटो ठरेल फायदेशीर दिवसातून अर्धा कप जांभळा टोमॅटो खाल्ल्यास त्यात असलेलं अँथोसायनिन ब्लूबेरीइतकंच उपयुक्त ठरतं. या टोमॅटोची टिकवणक्षमता सर्वसाधारण टोमॅटोच्या दुप्पट आहे. प्रा. मार्टिन यांच्या म्हणण्यानुसार, `हे औषध नाही, परंतु, त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स अनेक प्रकारे उपयुक्त ठरतात.` प्रा. मार्टिन सहसंस्थापक असलेल्या नॉरफोक प्लांट सायन्सेस कंपनीनं सांगितलं, `2023 पर्यंत जांभळे चेरी टोमॅटो बाजारात उपलब्ध होतील. तसंच या टोमॅटोची लागवड करता यावी यासाठी त्याचं बियाणंदेखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल.