नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : टीव्ही पाहणं हा मनोरंजनाचा घरबसल्या उपलब्ध असलेला एक उत्तम मार्ग आहे. सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठीचे कार्यक्रम त्यावर असल्याने घरातला प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार, आवडीनुसार टीव्ही पाहतो. पण येत्या 1 डिसेंबरपासून टीव्ही पाहण्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. कारण झी (Zee), स्टार (Star), सोनी (Sony) आणि व्हायकॉम 18 (Viacomm 18) या देशातल्या प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्सनी (Broadcasting Networks) आपल्या बुकेमधून काही चॅनेल्स वगळली आहेत. त्यामुळे चॅनेल्सच्या (Channels) बिलामध्ये 50 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI च्या नव्या टॅरिफ ऑर्डरमुळे हे दर वाढणार आहेत. TRAI ने मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनेल्सच्या किमतींसंदर्भात न्यू टॅरिफ ऑर्डर (New Tariff Order - NTO) प्रसिद्ध केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आता सर्व नेटवर्क्स NTO 2.0 च्या अनुषंगानेच आपल्या चॅनेल्सच्या किमती बदलत आहेत.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI चा विचार होता, की NTO 2.0 मुळे प्रेक्षकांना केवळ ते पाहत असलेल्या चॅनेल्सची निवड करण्याचं आणि तेवढेच पैसे मोजण्याचं स्वातंत्र्य मिळेल. ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या बुकेमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या चॅनेलचं मासिक भाडं (Monthly Rent of Channels) 15 ते 25 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आलं होतं. TRAI च्या नव्या टॅरिफ ऑर्डरमध्ये किमान शुल्क 12 रुपये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे बहुतांश चॅनेल्स प्रत्येकी केवळ 12 रुपयांत देणं नेटवर्क्ससाठी नुकसानकारक ठरू शकतं. हे नुकसान कमी करण्यासाठी काही नेटवर्क्सनी काही लोकप्रिय चॅनेल्स आपल्या बुकेबाहेर काढून त्यांचं शुल्क वाढवण्याचं ठरवलं आहे.
त्यामुळे स्टार प्लस, कलर्स, झी टीव्ही, सोनी आणि काही प्रादेशिक लोकप्रिय चॅनेल्स पाहण्यासाठी प्रेक्षकांना सध्याच्या तुलनेत 35 ते 50 टक्के जास्त शुल्क भरावं लागेल. नव्या शुल्कावर एक नजर टाकली, तर असं लक्षात येईल, की एखादा प्रेक्षक स्टार आणि डिस्ने इंडियाची चॅनेल्स कायम ठेवणार असेल, तर त्याला मासिक 49 रुपयांऐवजी त्याच चॅनेल्ससाठी 69 रुपये मोजावे लागणार आहेत. सोनीसाठी दर महिन्याला 39 रुपयांऐवजी 71 रुपये मोजावे लागतील. झीसाठी 39 रुपयांऐवजी 49 रुपये, तर व्हायकॉम 18 च्या चॅनेल्ससाठी 25 रुपये मासिक शुल्काऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत.