नवी दिल्ली, 10 मे : आता कोविड-19 वॅक्सिनेशन स्लॉट Paytm वर बुक करता येऊ शकतो. पेटीएम अॅपने आपल्या मिनी-अॅप स्टोरवर एक Covid-19 वॅक्सिन फाइंडर लाँच केलं आहे. या अॅपद्वारे केवळ वॅक्सिनेशन बुकिंग स्लॉटचीच माहिती मिळणार नाही, तर लसीकरण केंद्रावर वॅक्सिनची उपलब्धता आहे, की नाही हेदेखील समजणार आहे. पेटीएम प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना वॅक्सिन स्लॉट शोधण्यासाठी याद्वारे मदत होणार आहे. हे अॅप नवीन स्लॉट ओपन झाल्यावर अलर्ट करेल. सरकार, संस्था आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या विषाणूचा प्रतिकार करणं हेच आमचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले.
कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Paytm भारतातील जिल्ह्यातील 780 भागातील वॅक्सिन स्लॉटच्या उपलब्धतेला ट्रॅक करतं. तसंच नागरिक लोकेशन आणि वयाच्या आधारे वॅक्सिन स्लॉट फिल्टर करू शकतात. नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यास अॅप रियल टाईममध्ये अलर्ट करेल.
सध्या युजर्स वॅक्सिनेशनसाठी CoWin वेबसाईट आणि आरोग्य सेतू अॅपच्या माध्यमातून स्लॉट बुक करू शकतात. तसंच WhatsApp चॅटबॉटचा वापर करूनही लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येईल.