JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मुंबईत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर लगाम, चुकीच्या बाजूने Driving केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबईत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर लगाम, चुकीच्या बाजूने Driving केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबईत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्यात येणार असून, चुकीच्या किंवा विरुद्ध बाजूने (Wrong Side Driving) गाडी चालवल्यास एफआयआर (FIR) म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात येणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 मार्च : आपल्या देशात रस्ते अपघात (Road Accidents) आणि त्यात जाणारे बळी यांचे प्रमाण प्रचंड आहे. रस्ते अपघातांमागे मुख्य कारण असते ते बेदरकारपणे नियम न पाळता वाहन चालवणे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही (Mumbai) रस्ते अपघातांचे आणि वाहतूक कोंडीचे (Traffic Jam) प्रमाण वाढत असल्यानं वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे (Police Commissioner of Mumbai Sanjay Pandey) यांनी कठोर पाऊल उचलले आहे. आता मुंबईत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा करण्यात येणार असून, चुकीच्या किंवा विरुद्ध बाजूने (Wrong Side Driving) गाडी चालवल्यास एफआयआर (FIR) म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारपासूनच हे आदेश आपल्या विभागाला दिले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आता चुकीच्या बाजूने वाहन चालवणे (Wrong Side Driving) खपवून घेतले जाणार नाही. असे आढळल्यास तत्काळ वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करावा असे आदेश आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे वाहन जप्त केले जाईल आणि त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा -  सरकारने वाहनांसाठी जारी केला नवा नियम,या दोन गोष्टींशिवाय चालवता येणार नाही गाडी

‘चुकीच्या दिशेने गाडी चालवताना पकडलेल्यांवर भारतीय दंड संहिता किंवा मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जाईल,’ असं पांडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. जेजे आणि बीकेसी फ्लायओव्हरवर होणार्‍या सर्व प्रकारच्या बाईक रेसिंगच्या विरोधातही अधिकारी अंमलबजावणी मोहीम सुरू करणार असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर (Violators) केलेल्या कारवाईबाबतची माहिती एका आठवड्यात जाहीर केली जाईल. ‘बेदरकार वाहनचालकांमुळे केवळ त्यांना स्वत:लाच नाही तर पादचारी आणि इतर वाहनचालकांनाही धोका निर्माण होतो,’ असंही पांडे म्हणाले. याबाबत त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि त्यांना या मोहिमेबद्दल माहिती दिली. कोणत्याही नियमाचे उल्लंघन करताना वाहनचालक पकडला गेल्यास तो अडचणीत येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

हे वाचा -  …तर तुमचं Driving License लगेच करा अपडेट;अन्यथा होईल मोठं नुकसान,नवे आदेश जारी

आयुक्त संजय पांडे यांनी उचललेल्या पावलाचं ‘रोड्स ऑफ मुंबई’ हे ट्विटर हँडल चालवणारे सामाजिक कार्यकर्ते नारायण कन्नन (Narayan Kannan) यांनी कौतुक केलं. ते म्हणाले, ‘नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून प्रत्यक्ष कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन पोलिस विभागाला करत आहोत. जिथे सर्रासपणे असे उल्लंघन होत आहे त्या सर्व ठिकाणांचे व्हिडिओ, फोटो शेअर केले आहेत. सामान्यत: ज्यांना याबाबत तक्रार करायची आहे त्यांना मुंबई ट्रॅफिक अ‍ॅपवर तक्रार करावी असं सांगितलं जातं, पण हे अ‍ॅप बहुतांश वेळा बिघडलेलंच असतं. ई-चलन आल्यामुळे दंड तत्काळ भरण्याची सक्ती नसते. त्यामुळे अशा बेदरकर वाहनचालकांचा आत्मविश्वास वाढला आहे. इतकंच नाही, तर हळूहळू ऑटो चालक, रेडिओ कॅब आणि बेस्टच्या बसेसचे चालकही अशा वाहनचालकांच्या पावलावर पाउल टाकत आहे, त्यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे, असा दावाही कन्नन यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या