नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : देशभरात हायवेवर चालकांना गाडीवर फास्टॅग (FASTag) स्टिकर लावणं 15 फेब्रुवारी 2021 पासून बंधनकारक करण्यात आलं आहे. हायवेवरील टोल प्लाझामध्ये स्वतंत्र फास्टॅग लेन असेल जे वाहन फास्टॅग स्टिकर न लावता किंवा अवैध स्टिकर वाहनावर लावून त्या लेनमधून जाईल त्याला दुप्पट टोल भरावा लागेल. तसंच फास्टॅग असूनही काही वेळा काही कारणांमुळे दुप्पट टोल भरावा लागू शकतो. फास्टॅग नसलेली वाहनं, फास्टॅग लेनमध्ये आल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल घेतला जाऊ शकतो. फास्टॅग करायला विसरलात तर घाबरायची गरज नाही. तुम्ही टोल प्लाझाच्या अलीकडेही ते खरेदी करू शकता. परंतु फास्टॅग आधी जेथून खरेदी केला आहे, त्या संबंधित खात्यात पुरेसा बॅलेन्स नसल्यासही वाहनचालकांना अधिकचा टोल भरावा लागू शकतो. काही वाहनचालक फास्टॅग असतो, परंतु त्यात बॅलेन्स नसल्याने टोल प्लाझा येण्यापूर्वी काही मिनिटं आधीच रिचार्ज करतात. परंतु टोल नाका येईपर्यंत त्यात पैसे जमा न झाल्यास फास्टॅग कार्यान्वित असल्याचं दाखवत नाही. त्यामुळे आयत्या वेळी पैसे भरूनही, फास्टॅग खात्यात पैसे आले नसल्यानेही दुप्पट टोल भरावा लागू शकतो. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वीच फास्टॅगसंबंधी खात्यात पैसे आहेत ना, पुरेसा बॅलेन्स आहे ना याची खात्री करूनच बाहेर पडणं फायद्याचं ठरेल. अन्यथा काही कारणास्वत दुप्पट पैसे भरावे लागू शकतात.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, FASTag तिथेच रिचार्ज करा, जेथे तो खरेदी केला आहे. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल. जर ग्राहकाने दुसऱ्या बँकेतून FASTag रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील. तसंच एखाद्या बँकेची FASTag सुविधा आवडली नसल्यास, मोबाईल नंबरप्रमाणे पोर्टही करता येईल. ग्राहक FASTag आधी घेतलेल्या बँक किंवा एजेन्सीला रिटर्न करू शकतो आणि दुसऱ्या बँकेतून तो घेता येऊ शकतो. अशाप्रकारे FASTag पोर्ट केल्यानंतर यात नंबर आधीचाच राहतो. परंतु एकदा FASTag घेतल्यानंतर, ग्राहक 3 महिन्यांनंतरच, port सर्व्हिस वापरू शकतो.