नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : जगभरात जितकं वेगात डिजिटलाईजेशन वाढतं आहे, तसं ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणातही वाढ होत आहे. यामुळे भारतासह जगभरात ही मोठी चिंतेची बाब आहे. गुगल प्ले स्टोरवर (Google Play store) असे अनेक अॅप्स अपलोड होत आहेत, जे युजर्सचा डेटा आणि पैसा चोरी करण्याचं काम करत आहेत. गुगलने काही दिवसांपूर्वी फ्रॉडच्या तक्रारीनंतर 8 मोबाईल अॅप्सविरोधात कारवाई करत गुगल प्ले स्टोरवरुन ते अॅप्स हटवले होते. आता पुन्हा एकदा गुगलने (Google) धोकादायक अॅप गुगल प्ले स्टोरवरुन हटवलं आहेत. तसंच युजर्सलाही हे अॅप आपल्या फोनमधून डिलीट करण्याचं सांगितलं आहे. सिक्योरिटी फर्म Trend Micro ने क्रिप्टोकरंसी मायनिंग करणाऱ्या अॅप्सवर अभ्यास केला होता. त्यांच्या रिपोर्टनुसार, अनेक अॅप्स क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या नावाने युजर्सची फसवणूक करत होते. त्यांच्या रिपोर्टनंतर गुगलने अनेक अॅप्स आपल्या गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत. जे अॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले आहेत, त्यात Ethereum (ETH)- Pool Mining Cloud अॅप सामिल आहे. हे अॅप रिवेन्यू देण्याच्या नावाखाली युजर्सला जाहिराती दाखवत होतं. तसंच क्रिप्टोकरंसीसाठी युजर्सला हे अॅप खरेदी करण्याबाबतही सांगण्यात येत होतं.
महत्त्वाची बाब म्हणजे या अॅपची किंमत 14.99 डॉलर म्हणजेच जवळपास 1,095 रुपयांपासून ते 13870 रुपयांपर्यंत असते. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर यातून मोठा फायदा होत असल्याचं सांगितलं जातं. अनेक लोक यात अडकून पैसे खर्च करतात, परंतु त्याचा फायदा होत नाही. नुकसानापासून वाचण्यासाठी सिक्योरिटी फर्म Trend Micro ने युजर्सला हे अॅप लगेच आपल्या फोनमधून डिलीट करण्याबाबत सांगितलं आहे.