नवी दिल्ली, 31 मे : देशभरात दरवर्षी लाखो रस्ते (Road Accident) अपघात होतात. ड्रायव्हिंग करण्याआधी काहीशी सावधगिरी बाळगल्यास रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. यासाठी टेक्नोलॉजीवरही भर देऊन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरुन असे प्रयत्न सुरू आहेत, ज्याद्वारे रस्ते अपघात कमी केले जातील आणि जिवित-वित्त हानी कमी प्रमाणात होऊ शकेल. याच दिशेने पुढे जात चंडीगढमधील बीटेकच्या एका विद्यार्थ्याने एक जबरदस्त सॉफ्टवेअर आणणं आहे. या विद्यार्थ्याने एक सॉफ्टवेअर बनवलं आहे, जे सीट बेल्ट न लावल्यास आणि मद्यपान केलं असल्यास गाडी सुरुच करू शकत नाही. या सॉफ्टवेअरमध्ये एवढंच नाही, तर असे अनेक फीचर आहेत, ज्याद्वारे रस्ते अपघात रोखण्यास मदत होऊ शकेल. सॉफ्टवेअरची विशेष बाब म्हणजे, कार चालकाने सीट बेल्ट लावला नसल्यास कार स्टार्ट होणार नाही. तसंच जर एखादा व्यक्ती मद्यपान करुन गाडी चालवण्यासाठी बसला आणि अल्कोहोलचं प्रमाण 0.08 टक्क्यांच्या लीगल लिमिटहून अधिक असल्यास, कारचं इंजिन स्टार्ट होणार नाही. स्टेअरिंगला हात लावल्यास, त्यावर असलेल्या सेंसरच्या माध्यमातून कार चालकाने, ड्रायव्हरने अल्कोहोलचं सेवन केलं आहे की नाही ते समजण्यास मदत होईल. AI आणि मशीन लर्निंगचा वापर - चंडीगढ युनिव्हर्सिटीमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी मोहितने रोड पल्स नावाने असं सॉफ्टवेअर तयार केलं आहे, ज्याचा वापर केल्यानंतर रस्ते अपघात होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. या सॉफ्टवेअरमध्ये मोहितने लेटेस्ट टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगचा वापर केला आहे. येणाऱ्या काळात 2025 नंतर देश-जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंगवरच सर्व कामं होतील, हेच पाहता हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचं मोहितने सांगितलं. जर हे सॉफ्टवेअर गाडीमध्ये लाँच झालं, तर गाडीचा अपघात होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
कसं समजेल अल्कोहोलचं प्रमाण - सध्या या सॉफ्टवेअरद्वारे, सीट बेल्ट न लावल्यास बीप आवाज येतो, सीट बेल्ट नसल्यास या सॉफ्टवेअरमुळे गाडी स्टार्ट होणार नाही. तसंच ज्यावेळी कोणीही ड्रायव्हिंग सीटवर बसेल आणि श्वास घेईल, त्यावेळी त्याचे कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल्स समोर लावलेल्या सॉफ्टवेअरच्या ऑटो मीटरवर इंट्राडे सेंसर डिटेक्ट करुन सांगेल, की व्यक्तीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण लीगल लिमिटपेक्षा अधिक आहे की नाही. त्याशिवाय, रस्त्यावर गाडी चालवताना अनेकदा लोक यू-टर्न आणि डाव्या-उजव्या बाजूच्या इंडिकेटरचा वापर करत नाहीत आणि गाड्याचे अपघात होतात. हे रोखण्यासाठीही मोहितने आपल्या सॉफ्टवेअरमध्ये असं फीचर लावलं आहे, ज्याद्वारे गाडी स्वत:हूनच 50 मीटर अंतरावर असतानाच इंडिकेटर देणं सुरू करेल. यात गुगल मॅप मशीन लर्निंगशी जोडण्यात आलं आहे.
धुक्यामध्येही अपघात होण्यापासून बचाव करेल सॉफ्टवेअर - धुक्यात व्हिजिबिलिटी अतिशय कमी होते. त्यामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात. त्यासाठी मोहितने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करुन, एक अशी टेक्नोलॉजी निर्माण केली आहे, ज्याद्वारे धुक्यातही मागे-पुढे असलेल्या कार आणि वस्तूंची माहिती मिळेल. हे सॉफ्टवेअर कारच्या पुढील भागात लावलेलं असेल, जे कारच्या पुढे 50 मीटरवरील अंतर सांगेल, त्यामुळे कार चालक कार कंट्रोल करू शकतो. या सॉफ्टवेअरमुळे अपघातांची संख्या कमी करता येऊ शकते. 20 वर्षीय मोहितने याआधीही त्याच्या नावे अनेक यशस्वी कामगिरी केली आहे. त्याची टीम 54 तासांत युनायटेड बॉय प्लेयर्स नावाचं अॅप तयार करुन गुगल स्टार्टअप वीकेंडमध्ये दुसऱ्या क्रमांकासह यशस्वी झाली आहे.