नवी दिल्ली, 28 जून : पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पेट्रोलचा प्रति लिटर दर 100 रुपयांहून अधिक आहे. त्यामुळे ज्यांना दररोज कार वापरण्यावाचून पर्याय नाही, अशा व्यक्तींना खूप आर्थिक झळ सोसावी लागत आहे. पेट्रोलच्या (Petrol) किमती वाढत असल्याने लोक डिझेलच्या (Diesel) गाड्यांकडे वळत आहेत, मात्र डिझेल कार्सच्या किमती पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त असतात. तसंच डिझेस कार्सच्या मेंटनन्सचा (Maintenance) खर्चही जास्त असतो. या पार्श्वभूमीवर, तुलनेने स्वस्त असलेल्या, म्हणजेच एक्स-शोरूम किंमत 5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि मायलेज उत्तम असलेल्या काही ऑटोमॅटिक पेट्रोल कार्स आहेत. या कार्स उत्तम मायलेज (Mileage) असलेल्या फॅमिली कार म्हणून ओळखल्या जातात. रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) - फ्रान्सच्या रेनॉल्ट (Renault) कंपनीची ही कार त्या कंपनीच्या कार्सपैकी सर्वांत कमी किंमत असलेल्या उत्तम कार्सपैकी एक आहे. या कारला स्पोर्टी लूक आणि स्पोर्टी डिझाईन देण्यात आलं आहे. 800 सीसी क्षमतेचं इंजिन असलेली ही कार एक लिटर क्षमतेच्या दोन इंजिनांच्या पर्यायासहदेखील उपलब्ध आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), 8 इंचाच्या टचस्क्रीनसह एन्फोटेन्मेंट सिस्टम, कीलेस एन्ट्री आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर असे फीचर्स आहेत. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 4,72,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) असून, या कारचं सरासरी मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर एवढं आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) - देशातली प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) एस-प्रेसो ही आपली सर्वांत उत्तम मायलेज असलेली कार बाजारात सादर केली आहे. त्यात एक लिटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरण्यात आलं आहे. ते 68PS पॉवर आणि 90Nm टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), 7 इंची टचस्क्रीनची एन्फोटेन्मेंट सिस्टम, कीलेस एन्ट्री, पॉवर विंडो अशा सुविधा आहेत. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 4,82,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) एवढी आहे. या कारचं सरासरी मायलेज 21.7 किलोमीटर प्रतिलीटर एवढं आहे.
डॅटसन रेडी-गो (Datsun redi-Go) - जपानच्या डॅटसन (Datsun) या कंपनीने रेडी-गो या कारची निर्मिती केली आहे. ही एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. यात 1.0 लिटरच्या क्षमतेचं पेट्रोल इंजिन आहे. ते 69PS पॉवर आणि 91Nm टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये डिजिटल टॅकोमीटर, LED डे टाईम रनिंग लाईट्स, 8 इंची एन्फोटेन्मेंट सिस्टम, 14 इंची अॅलॉय व्हील, कीलेस एन्ट्री असे फीचर्स आहेत. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 4,92,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. या कारचं सरासरी मायलेज 22 किलोमीटर प्रतिलीटर एवढं आहे.