मेड इन इंडिया असॉल्ट रायफलचा डिफेन्स एक्स्पोमध्ये डंका
मुंबई, 18 ऑक्टोबर : भारतीय संरक्षण दलाचा जगात चौथा क्रमांक लागतो. स्वातंत्र्यापासून ते आत्तापर्यंत भारतीय संरक्षण दलानं अनेक शस्त्रांची निर्मिती आणि बांधणी केली आहे. आपल्या याच आयुधांची जनतेला ओळख व्हावी यासाठी ‘डिफेन्स एक्सपो’चं आयोजन केलं जातं. या वर्षी 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आशियातील सर्वांत मोठं डिफेन्स एक्सपो आयोजित केलं आहे. गुजरातमधील गांधीनगरमध्ये भरलेल्या डिफेन्स एक्सपो 2022 या शस्त्र प्रदर्शनात विविध शस्त्रं मांडली आहेत. या वर्षीच्या एक्सोपमध्ये भारतीय ‘असॉल्ट रायफल AK-203’ प्रथमच प्रदर्शित करण्यात आली आहे. या रायफलची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या रायफलचा लष्कराला युद्धात कसा उपयोग होईल? AK-203 असॉल्ट रायफल ही ‘एके सीरिज’मधील अत्याधुनिक घातक रायफल आहे. इंडो-रशिया रायफल्स प्रा. लि. (IRRPL) या कंपनीकडून तिची निर्मिती केली जाणार आहे. ही रायफल उपलब्ध झाल्यानंतर भारतीय लष्कर आणि इतर निमलष्करी दलं इन्सास (INSAS) रायफलींचा वापर बंद करतील. भारतीय लष्कराला 7.50 लाख AK-203 रायफलची गरज आहे. या रायफलचा पहिला प्रोटोटाइप 2007 मध्ये AK-200 नावाने आला होता. 2013 मध्ये, रॅटनिक प्रोगॅमअंतर्गत AK-203मध्ये काही बदल करून तिचं AK-103-3 असं नामकरण करण्यात आलं. त्यानंतर 2019 मध्ये याच रेंजमधील AK-300 आणि AK-100M रायफल्स तयार करण्यात आल्या. 2019 मध्ये AK-103-3ला पुन्हा AK-203 या नावानं लाँच केलं गेलं. इन्सास रायफलपेक्षा AK-203 अधिक घातक आणि ऑपरेट करणं अधिक सोपं आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. AK-203 रायफल ही इन्सासपेक्षा लहान, वजनाला हलकी आणि प्राणघातक आहे. मॅगझिन आणि बेयोनेट नसताना इन्सासचं वजन 4.15 किलोग्रॅम आहे तर, AK-203 चे वजन 3.8 किलीग्रॅम आहे. इन्सासची लांबी 960 मिलीमीटर आहे तर AK-203ची लांबी 705 मिलीमीटर आहे. कमी वजन आणि कमी लांबीमुळे AK-203 रायफल बराच काळ कॅरी करता येऊ शकते. ती हाताळणे सोपं असल्यामुळे जवानांची कमी दमछाक होते. AK-203मध्ये 7.62x39 मिलीमीटरच्या प्राणघातक बुलेट वापरल्या गेल्या आहेत. 5.56x45 मिलीमीटर लांबीच्या बुलेट वापरलेल्या इन्सासची रेंज 400 मीटर इतकी आहे. तर, AK-203ची रेंज 800 मीटर आहे. म्हणजेच, AK-203च्या मदतीने शत्रूला लांबून टारगेट करता येईल. त्याला मारण्यासाठी जवळ जाऊन आपला जीव धोक्यात घालण्याची जोखिम पत्करावा लागणार नाही. वाचा - International Students Day : विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अनमोल विचार इन्सास सिंगल शॉट आणि तीन-राउंड बर्स्ट फायर करू शकते. AK-203 ही सेमी-ऑटोमॅटिक किंवा ऑटोमॅटिक मोडमध्ये चालते. याबाबीत इन्सास अधिक प्रभावी आहे. इन्सासमधून एका मिनिटात 650 गोळ्या झाडता येतात. AK-203मधून एका मिनिटात 600 गोळ्या झाडता येतात. इन्सासच्या तुलनेत AK-203चा मारा अधिक अचूक आहे. इन्सासमध्ये 20 ते 30 राऊंड मॅगझीनचा वापर होतो तर, AK-203मध्ये 30 राउंड्सचं बॉक्स मॅगझिन वापरलं आहे. इन्सासचा वेग 915 मीटर प्रति सेकंद इतका आहे. AK-203 चा वेग 715 मीटर प्रति सेकंद आहे. दोन्ही रायफल गॅस ऑपरेटेड आणि रोटेटिंग टेक्निकने काम करतात. इन्सास रायफलमध्ये इन-बिल्ट आयर्न साइट, माउंट पॉईंट बसवता येतो, त्यामुळे शत्रूचं दुर्बिणीद्वारे निरीक्षण करता येतं. या बाबतीत AK-203 अधिक चांगली आहे. कारण त्यात अॅडजेस्टेबल आयर्न साइट आहे. याशिवाय Picatinny रेल लावलेली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही प्रकारची दुर्बीण या रायफलवर बसवता येऊ शकते.
अमेठीच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भारत आणि रशिया संयुक्तपणे या असॉल्ट रायफलची निर्मिती करणार आहेत. डिफेन्स एक्सपो 2022 मध्ये, Rosoboronexport ही रशियन कंपनी भारत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करेल. जेणेकरून उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात असलेल्या कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये या असॉल्ट रायफलचं उत्पादन सुरू करता येईल. Rosoboronexport ही रशियन संरक्षण कंपनी रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे. पुढील दहा वर्षांत अमेठीमध्ये 6.01 लाख AK-203 असॉल्ट रायफलची निर्मिती केली जाईल. त्यापूर्वी रशियातून 70 हजार ते एक लाख रायफल्स, त्याचे पार्ट्स आणि टेक्नॉलॉजी भारतात आणली जाणार आहे. भारतातील कारखान्यात काम सुरू झाल्यानंतर सुमारे 32 महिन्यांनंतर लष्कराला ही रायफल प्रत्यक्ष वापरासाठी मिळणार आहे.