नवी दिल्ली, 11 मे : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात लॉकडाउनची घोषणा केली आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. दारुची दुकानं, बार बंद आहेत. अनेक राज्यात ऑनलाईन माध्यमातून गरजेच्या वस्तू ऑर्डर केल्या जात आहे. अशात आता छत्तीसगढ राज्याने दारुची होम डिलीव्हरीच सुरू केली आहे. दारुची होम डिलीव्हरी सुरू होताच, पहिल्याच दिवशी अॅपवर इतक्या ऑर्डर्स आल्या, की अॅप क्रॅश झालं. लॉकडाउनमुळे दारुची दुकानं, बार बंद असल्याने पहिल्याच दिवशी अॅपवर मोठ्या प्रमाणात आलेल्या ऑर्डर्समुळे अॅप क्रॅश झालं. सकाळी 9 वाजल्यापासून लोक या अॅपद्वारे दारुच्या होम डिलीव्हरीसाठी ऑर्डर करत होते. त्यामुळे काही वेळातच अॅप क्रॅश झालं, आणि त्यानंतर कोणालाही ऑर्डर देता येत नव्हती. अॅप क्रॅश होताच, लोकांकडून अॅप ठीक करण्याची मोठी मागणी होत होती. काही वेळात अॅप ठीक केल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आलं. पण परत पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणत ऑर्डर्स आल्या, की दुपारपर्यंत पुन्हा दुसऱ्यांदा अॅप क्रॅश झालं.
उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, अरविंद पटेल यांनी सांगितलं, की रायपूरमध्ये पहिल्याच दिवशी दुपारी जवळपास 3500 लोकांनी दारुच्या होम डिलीव्हरीसाठी अॅपद्वारे पेमेंट केलं. संपूर्ण राज्यात हा आकडा जवळपास 20 हजार पार झाला. लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स केल्या, की सर्व्हर पूर्णपणे ठप्प झाला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्येही छत्तीसगढमध्ये दारुच्या ऑनलाईन डिलीव्हरीची सुरुवात केली गेली होती. सध्या कोणत्याच राज्यात लॉकडाउन काळात दारु दुकानं सुरू करण्यास परवानगी नसल्याने, ऑनलाईन डिलीव्हरीची मागणी वाढत आहे.