दुबई, 15 मार्च : खराब फॉर्ममध्ये असलेली भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिला आयसीसी वनडे क्रमवारीतही (ICC Rankings) धक्का बसला आहे. चौथ्या क्रमांकावर असलेली मिताली राज तीन स्थान खाली सातव्या क्रमांकावर आली आहे. तर टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) 11 व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मितालीने सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 31 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 5 रन केले होते. दुसरीकडे स्मृती मंधानाने वेस्ट इंडिजविरुद्ध 123 रनची खेळी केल्यानंतरही ती टॉप-10 मधून बाहेर झाली आहे. बॅटिंगमध्ये न्यूझीलंडची सॅटर्थवेट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वोल्वार्टला फायदा झाला आहे. सॅटर्थवेट पाच स्थान वरती तिसऱ्या क्रमांकावर तर वोल्वार्ट पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची एलिसा हिली बॅटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी भारताची फास्ट बॉलर झुलन गोस्वामीलाही (Jhulan Goswami) दोन स्थानांचं नुकसान झालं आहे. झुलन गोस्वामी आता सहाव्या क्रमांकावर आहे. तर दीप्ती शर्मा ऑलराऊंडरच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर कायम आहे. इंग्लंडला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अजून एकही सामना जिंकता आलेला नाही, पण सोफी एक्लेस्टोन बॉलरच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. एशले गार्डनर ऑलराऊंडरच्या यादीत दोन क्रमांक वर सातव्या क्रमांकावर आली आहे. तिने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 48 रन केले आणि 2 विकेटही घेतल्या. ऑलराऊंडरच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी पहिल्या क्रमांकावर आहे.