...जेव्हा सचिननं घातली शाहरुखला 'टोपी'!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपासून ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानपर्यंत सारेच सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नुकताच सचिनने शाहरुखसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे

Sonali Deshpande
मुंबई, ०३ जुलै: आपल्या आवडत्या कलाकारांच्या आणि खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतं हे जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा असते. आपल्या चाहत्यांची हीच इच्छा सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण करत असतात. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरून कलाकार सतत आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरपासून ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानपर्यंत सारेच सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नुकताच सचिनने शाहरुखसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता तुम्ही म्हणाल की, दोघं एकमेकांना तर फार आधीपासून ओळखतात तर मग यात काय नवीन.. पण खरी गंमत तर त्यांच्या भेटीमध्ये नसून त्यांच्या पेहरावात आहे. शाहरुखने सचिनसोबत मराठमोळी टोपी घातली आहे. यावेळी दोघांच्या कपाळावर टीळाही आहे. नेमकी हीच गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'जेव्हा एसआरके एसआरटीला भेटतो...' असे कॅप्शन सचिनने या फोटोला दिले आहे. आतापर्यंत या फोटोला ७ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून फोटोवर हजारांहून जास्त कमेंट आल्या आहेत.

सचिनच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करताना म्हटले की, क्रिकेटचा देव आणि बॉलिवूडचा देव एकाच फ्रेममध्ये. तर दुसऱ्या युझरने लिहिले की, दोन दिग्गज एकाच फोटोमध्ये. याच धाटणीच्या अनेक कमेंट सचिनच्या या फोटोला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन आणि शाहरुखला मुकेश अंबानीचा मुलगा आकाश आणि श्लोकाच्या साखरपुड्याच्या पार्टीत पाहण्यात आले होते. यावेळी सचिन पत्नी अंजली आणि मुलगी सारासह उपस्थित राहिला होता. तर शाहरुखनेही पत्नी गौरी आणि मुलगा आर्यनसोबत पार्टीला हजेरी लावली होती. शाहरुखच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच शाहरुख झिरो सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याने एका ठेंणग्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. झिरो सिनेमात शाहरुखसोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Trending Now