Virat Kohli
नवी दिल्ली, 23 डिसेंबर: टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यातील मतभेद काही दिवसांपूर्वी समोर आले होते. विराटने दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कॅप्टन आणि अध्यक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे उघड झाले. दरम्यान, त्यांच्या वादावर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) उडी घेतली आहे. शाहिद आफ्रिदीने विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील वादावर भाष्य करत दादावर सडकून टीका केली. “बीसीसीआयमध्ये निर्माण झालेला वाद योग्यरित्य हाताळता आला असता. क्रिकेट बोर्डाची भूमिका नेहमीच निर्णायक आणि महत्त्वाची असते, असं मी नेहमीच म्हणत आलोय. सिलेक्शन कमीटीने खेळाडूला कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्ट सांगावं, की आमची अमूक अमूक अशी योजना आहे जी टीमसाठी पूरक आहे. विराट आणि गांगुलीने एकत्र बसून बोलायला हवे. माध्यमांसमोर या अशा मुद्द्यांमुळे वाद निर्माण होतात”, असे मत आफ्रिदीने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना व्यक्त केले. यापूर्वी, माजी कॅप्टन आणि निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी (Dilip Vengsarkar) या प्रकरणात सौरव गांगुलीला सुनावले होते. ‘निवड समितीच्या वतीनं सौरव गांगुलीला बोलण्याची काहीही गरज नव्हती. तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. कॅप्टनच्या नियुक्तीबाबत निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बोलायला हवे होते. कॅप्टनची निवड करणे किंवा त्याला हटवणे हा निवड समितचा विषय आहे. ते गांगुलीचे कार्यक्षेत्र नाही.’ असे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले आहे. बीसीसीआयने विराटला वनडे कॅप्टन्सीवरुन काढलं. त्यानंतर रोहितला ही जबाबदारी सोपवण्यात आली. विराटने यानंतर पत्रकार परिषद घेतली. विराटने या पत्रकार परिषदेत काही मुद्दे मांडले. मला टी 20 संघाचं नेतृत्व सोडू नको, असं कोणीही म्हंटलं नाही. तर वनडे कॅप्टन्सी सोडण्यासाठी माझ्याशी संपर्क केला गेला, असं विराट म्हणाला होता. तर मी वैयक्तिकरित्या विराटला टी 20 कॅप्टन्सी सोडू नकोस, असे गांगुली म्हणाला होता. यावरुन या कर्णधारपदाच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटले.