कसोटीत 1206 दिवसांनी विराटच शतक, 75व्या शतकासह गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी
मुंबई, 12 मार्च : अहमदाबाद येथे सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक ठोकले आहे. हे विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक असून कसोटी क्रिकेटमधील त्याचे 28 वे शतक ठरले. 2019 नंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार शतक झळकावल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल तिसऱ्या दिवसाअंती भारताची गुण संख्या 3 बाद 289 इतकी होती. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे दोघे मैदानात उतरले. परंतु विराट आणि जडेजाची चांगली भागीदारी सुरु असतानाच काही ओव्हर्सनंतर जडेजाची विकेट पडली. जडेजा 84 चेंडूंत 28 धावांवर माघारी परतला. तर त्यांनंतर मैदानात आलेल्या केएस भारतने विराट सोबत पुन्हा अर्धशतकीय भागीदारी केली परंतु 44 धावा करून त्याचीही विकेट पडली. परंतु त्यानंतर विराटची बॅट तळपतचं राहिली आणि त्याने 22 नोव्हेंबर 2019 नंतर आज कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकले.
विराटने कसोटीतील 28 व्या शतकासह भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. सुनील गावस्कर यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 कसोटी शतक ठोकली होती. तर विराटने देखील आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने कसोटीतील 8 वे शतक पूर्ण केले. याशतकानंतर विराटने आपल्या गळ्यातील लॉकेटला किस करून आपले शतक साजरे केले.