मुंबई, 1 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) बुधवारी एक ट्वीट करत चाहत्यांना संभ्रमात टाकलं. गांगुलीने सुरूवातीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण काही वेळातच बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी गांगुलीने राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं. गांगुलीच्या या ट्वीटनंतर मात्र सोशल मीडियावर त्याच्या नव्या इनिंगची जोरदार चर्चा सुरू झाली. काय म्हणाला सौरव गांगुली? ‘1992 साली माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरूवात झाली. 2022 मध्ये आता याला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटने मला बरंच काही दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून मला पाठिंबा मिळाला. या प्रवासात मला पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. त्यांच्या मदतीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी आजपासून काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे अनेकांना मदत मिळेल. आयुष्याच्या नव्या पर्वात तुमच्या सगळ्यांचा असाच पाठिंबा मिळत राहिल, अशी आशा करतो,’ असं ट्वीट गांगुलीने केलं.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधीपासूनच सौरव गांगुली राजकारणात येईल, याची चर्चा सुरू होती. भाजप सौरव गांगुलीला मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून प्रोजेक्ट करेल, असंही बोललं गेलं पण तेव्हा असं काहीही झालं नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी गांगुलीच्या घरी जाऊन भोजनाचा आस्वाद घेतला. तेव्हापासून पुन्हा एकदा गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या.
सोशल मीडियावर गांगुलीने हे ट्वीट केल्यानंतर अनेकांनी तो राज्यसभेवर जाईल असा अंदाज वर्तवला तर काहींनी त्याला क्रीडा मंत्री करण्यात येईल, असंही बोलून दाखवलं. एका यूजरने गांगुली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करेल, अशी शक्यताही वर्तवली.
अनुराग ठाकूर यांना हिमाचल प्रदेशचं मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं, त्यामुळे त्यांच्याऐवजी गांगुलीला क्रीडा मंत्री करण्यात येईल, असा दावा एकाने केला.
काही जणांनी गांगुली कसली तरी जाहिरात करत असल्याची शक्यता वर्तवली, तर एकाने गांगुली कोलकात्यामध्ये दुर्गा पुजेनंतर रसगुल्ले वाटणार आहे, असा विनोद केला.