टोकयो, 26 जुलै: ऑलिम्पिक खेळात मेडल जिंकणं हे प्रत्येक क्रीडापटूचं स्वप्न असतं. ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी देखील त्यांना त्यांचा खेळ उंचवण्याची गरज असते. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धामध्ये सर्व दिग्गज खेळाडूंना पराभूत करत मेडल जिंकणे हा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असतो. दर चार वर्षांनी काही मोजक्या खेळाडूंनाच हे भाग्य मिळते. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सोमवारचा दिवस लहान मुलींनी गाजवला. 13 वर्षांच्या या दोन मुलींनी एकाच खेळात गोल्ड आणि सिल्व्हर मेडलची कमाई केली आहे. महिलांच्या स्केटबोर्डिंग खेळात यजमान जपानच्या निशिया मोमोजीनं (Nishiya Momij) गोल्ड तर ब्राझीलच्या रायसा लीलनं (Rayssa Leal) सिल्व्हर मेडल मिळवले. विशेष म्हणजे निशिया आणि रायसा या दोघीही फक्त 13 वर्षांच्या आहेत. या स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारी निशिया ही जपानची पहिली महिला स्केटर आहे. जपानच्या फुना नाकायाम (Funa Nakayama) हिनं या स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकले. फुना देखील या दोघींपेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी म्हणजेच 16 वर्षांची आहे.
…. तर मीराबाईला मिळू शकतं Gold! चीनच्या विजेतीची होतेय डोपिंग टेस्ट निशिया मोमोजीला या ऐतिहासिक कामगिरीनंतर अश्रू आवरले नाहीत. तिनं वयाच्या 8 व्या वर्षीच या खेळाचा सराव सुरू केला होता. गेल्या पाच वर्षांपासून कठोर मेहनत घेतल्याचं फळ तिला अखेर मिळालं आहे. तर ब्राझीलची रायसा लीलनं देखील अगदी कमी वयात या खेळात मोठी प्रगती केली आहे. रायसानं वयाच्या सातव्या वर्षी 2015 साली स्केटबोर्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ब्राझीलची स्केटबोर्ड रानी अशी तिची ओळख आहे.