मुंबई, 15 मे : भारतीय बॅडमिंटन टीमच्या (Indian Badminton Team) इतिहासात 15 मे 2022 या दिवसाची सुवर्णाक्षरानं नोंद झाली आहे. भारतानं थॉमस कप (Thomas Cup 2022) स्पर्धेच्या फायनलमध्ये बलाढ्य इंडोनेशियाचा 3-0 असा सरळ पराभव करत विजेतेपद (India beat Indonesia) पटकावले आहे. भारतीय टीम पहिल्यांदाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचली होती. तर इंडोनेशियानं ही स्पर्धा आत्तापर्यंत 14 वेळा जिंकली होती. पण, भारतीय टीमनं संपूर्ण स्पर्धेप्रमाणेच फायनलमध्येही दमदार खेळ करत ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. भारताकडून लक्ष्य सेननं पहिला सामना जिंकला. लक्ष्यनं एंथोनीचा 8-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. त्यानंतर सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं 18-21, 23-21, 21-19 या फरकानं दुहेरीचा सामना जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली. तर, किदांबी श्रीकांतनं जोनाथम ख्रिस्टीचा 21-15, 23-21 असा पराभव केला. या विजयासह भारतीय टीमनं पहिल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय टीमनं या संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला. मलेशिया आणि डेन्मार्क टीमचा त्यांनी फायनलपूर्वी पराभव केला होता. फायनलमध्ये त्यांनी या स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या इंडोनेशियाचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातून अनेकांनी या यशाबद्दल भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे.