दुबई, 24 ऑक्टोबर : भारताविरुद्धच्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सामन्यात पाकिस्तानने (India vs Pakistan) धमाकेदार सुरुवात केली आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) रुपात पहिला धक्का दिला. पहिल्या बॉलवरच रोहित शर्मा आऊट झाला. याचसह शाहिन आफ्रिदीने टी-20 क्रिकेटमधलं आपलं रेकॉर्ड कायम ठेवलं आहे. यानंतर पुढच्याच ओव्हरला शाहिन आफ्रिदीने केएल राहुलला (KL Rahul) बोल्ड केलं. 8 बॉलमध्ये 3 रन करून केएल राहुल आऊट झाला. डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) बड्या बड्या ओपनरची बोलती बंद करू शकतो. फक्त 21 वर्षांच्या या ओपनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. शाहिन आफ्रिदीनकडे 19 टेस्ट, 28 वनडे आणि 30 टी-20 मॅचचा अनुभव आहे. पाकिस्तानचे अनेक चाहते शाहिनची तुलना वसीम अक्रम (Wasim Akram) आणि मोहम्मद आमीरशी (Mohammad Amir) करतात. पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) मिकी आर्थर यांनी शाहिनची तुलना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कशी केली होती. एवढ्या कमी अनुभवामध्ये शाहिन आफ्रिदीने आपल्या जलद आणि अचूक बॉलिंगने अनेक बड्या खेळाडूंना हैराण केलं. 6 फूट 6 इंचांचा शाहिन आफ्रिदी टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरचा बादशाह आहे. फेब्रुवारी 2018 साली टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहिनने 62 इनिंगमध्ये 21 वेळा पहिल्या ओव्हरमध्येच विकेट घेतली आहे. एवढच नाही तर त्याने एकदा पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेटही मिळवल्या आहेत. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये शाहिनला आतापर्यंत 22 विकेट मिळाल्या आहेत. या रेकॉर्डमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा इमाद वसीम आहे. इमादने पहिल्या ओव्हरमध्ये 13 विकेट मिळवल्या. हे रेकॉर्ड बघून शाहिन आफ्रिदी इतर खेळाडूंपेक्षा किती धोकादायक आहे, ते लक्षात येतं. शाहिन आफ्रिदीच्या यॉर्करचा सामना करणं कित्येकवेळा खेळाडूंसाठी त्रासदायक ठरतं. शाहिन आफ्रिदीला भारताविरुद्ध फक्त एकच सामना खेळायला मिळाला आहे. 2018 साली आशिया कपवेळी शाहिन भारताविरुद्ध खेळला होता, त्यावेळी त्याने 6 ओव्हर बॉलिंग केली, पण त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.