लाहोर,28 डिसेंबर: कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याच्यावर गंभीर आरोप केले आहे. पाकिस्तानात हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांसोबत भेदभाव केला जात असता तर हिंदू असलेला दानिश कनेरिया पाकिस्तान संघासाठी 10 वर्षे खेळूच शकला नसता, असे जावेद मियाँदाद यांनी म्हटले आहे. दानिश कनेरिया हा विश्वासपात्र नाही. तो पैशासाठी काहीही बोलू शकतो, असा आरोपही मियाँदाद यांनी केला आहे. पाकचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी दानिश कनेरिया याच्या संदर्भात एक गौप्यस्फोट केला होता. दानिश हिंदू असल्यामुळे पाकिस्तानी संघ त्याला चांगली वागणूक देत नव्हता. त्याच्याबाबत अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या. दानिशसोबत का जेवतोस, असेही काही क्रिकेटपटू आपल्याला विचारत होते, असे शोएबने एका चॅट शोमध्ये सांगितले होते. कनेरिया यानेही शोएबच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. मियाँदाद यांनी केला पाकचा बचाव पाकिस्तानने दानिश कनेरिया याला भरपूर काही दिले आहे. पाकिस्तान संघासाठी त्याने 10 वर्षे कसोटी सामने खेळले आहे. त्याच्यासोबत भेदभाव केला गेला असता तर हे संभव झाले असते का? असा प्रतिसवालही केला आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये कधीही क्रिकेटपटूंच्या धर्माबाबत भेदभाव केला जात नाही, असे सांगत मियाँदाद यांनी पाकिस्तानचा बचाव केला आहे. पाकमध्ये हिंदू क्रिकेटपटूचा ‘छळ’, भाजपने शेअर केला शोएब अख्तरचा VIDEO दरम्यान, भाजपकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंचा कसा छळ होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा हा व्हिडिओ भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी शेअर केला आहे. यामध्ये शोएब अख्तरने सांगितले आहे की, कशा प्रकारे हिंदू असल्याने दानिश कनेरियाला पाकिस्तानचे खेळाडू एकटे पाडतात. तसेच त्याच्यासोबत कसे वागायचे हेदेखील अख्तरने सांगितले आहे. मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, नागरिकत्व सुधारणा कायद्यामुले पाकिस्तानमध्ये छळ सोसणाऱ्या हिंदूंना भारतात आश्रय मिळत असेल तर मुस्लिम काँग्रेस आणि इतर लोक त्याला विरोध का करत आहेत?
भाजपचे आयटीसेल प्रमुख मालवीय यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अख्तर म्हणतो की, मी माझ्या कारकिर्दीत दोन-तीन जणांशी वाद केला. जेव्हा लोक कराची, पेशावर किंवा पंजाबबद्दल बोलायचे तेव्हा मला राग यायचा. जर कोणी हिंदू असेल तर तो खेळेल. त्याच हिंदूने कसोटी मालिका जिंकून दिली. मी म्हटलं आता बोला… सर हा इथून जेवण का घेत आहे? तुला बाहेर उचलून फेकून देईन. देशाला 6-6 विकेट काढून तो देत आहे. मी फेमस झालो असलो तरी मालिका दानिशने जिंकून दिली आहे. याबाबत दानिश कनेरियाने एएनआयशी बोलताना सांगितलं की, शोएब अख्तरनं जे आरोप केले त्यात तथ्य आहे. मी हिंदू असल्याने पाकचे खेळाडू माझ्याशी बोलायचेसुद्धा नाहीत. हिंदू आहे म्हणून बोलणं टाळणारे किंवा हिणवणारे यांचे नावही मी आता जाहीर करू शकतो असंही दानिशने म्हटलं.