मुंबई, 1 जून : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेल्या एका ट्वीटमुळे जोरदार चर्चा झाल्या. आयुष्यात नवी सुरूवात करत असल्याबद्दलचे संकेत गांगुलीने या ट्वीटमध्ये दिले, त्यानंतर गांगुली राज्यसभेवर जाणार तसंच क्रीडा मंत्री होणार इथपर्यंत चर्चा झाल्या, तसंच गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची वृत्तही प्रसिद्ध झाली, पण गांगुलीच्या राजीनाम्याच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं. एवढ्या सगळ्या गोंधळानंतर आता सौरव गांगुलीने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या सगळ्यात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या गांगुलीने वर्ल्डवाईड एज्युकेशनल ऍप लॉन्च केलं आहे. हे ट्वीट गांगुलीने यासाठीच केलं होतं. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ‘मी एक एज्युकेशनल ऍप लॉन्च केलं आहे,’ असं गांगुलीने कोलकात्यामध्ये सांगितलं.
काय म्हणाला होता गांगुली? ‘1992 साली माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरूवात झाली. 2022 मध्ये आता याला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटने मला बरंच काही दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून मला पाठिंबा मिळाला. या प्रवासात मला पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. त्यांच्या मदतीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी आजपासून काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे अनेकांना मदत मिळेल. आयुष्याच्या नव्या पर्वात तुमच्या सगळ्यांचा असाच पाठिंबा मिळत राहिल, अशी आशा करतो,’ असं ट्वीट गांगुलीने केलं.