मुंबई, 25 जुलै : पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरची (Shoaib Akhtar Biopic) बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रावळपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेंस्ट द ऑड्स’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. शोएबने त्याच्या युट्यूब चॅनलवरून चित्रपटाचा मोशन पोस्टर लॉन्च केलं आहे. यामध्ये चित्रपटाच्या रिलीजची तारीखही देण्यात आली आहे. हा चित्रपट 16 नोव्हेंबर 2023 ला चित्रपटगृहात येणार आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एक व्यक्ती रेल्वे पटरीवरून धावताना दिसत आहे. शोएबचा जन्म रावळपिंडीमध्ये झाला. आपल्या जलद वेगाने जगभरातल्या दिग्गजांना घाबरवणाऱ्या शोएबला रावळपिंडी एक्सप्रेस हे नाव पडलं. याच नावाने आता त्याचा बायोपिकही येणार आहे. शोएब अख्तरच्या बायोपिकचे डायरेक्टर मुहम्मद फजर कासीर आहेत. शोएबने त्याच्या बायोपिकचं मोशन पोस्टर ट्विटरवरूनही शेअर केलं आहे. ‘या सुंदर प्रवासाला सुरूवात, माझी कहाणी, माझं आयुष्य, माझा बायोपिक, रावळपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेंस्ट द ऑड्स येत आहे. तुम्हीही या प्रवासासाठी तयार व्हा.’ असं कॅप्शन शोएबने या फोटोला दिलं आहे.
बायोपिकमध्ये शोएब अख्तरची भूमिका कोण साकारणार? याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. पण शोएबने खूप आधी सलमान खानने आपली भूमिका करावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी 46 टेस्ट, 163 वनडे आणि 15 टी-20 मॅच खेळल्या. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याने 400 विकेट घेतल्या, पण विकेटपेक्षा त्याची ओळख वेगामुळेच जास्त होती. 100 मिल प्रती तासाने बॉल टाकणारा तो जगातला पहिला बॉलर होता. 2002 साली न्यूझीलंडविरुद्ध त्याने हा विक्रम केला होता.