मुंबई, 17 मे : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्याच्या आक्रमक बॅटिंगसोबतच स्पष्टवक्तेपणामुळेही प्रसिद्ध आहे. सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यातल्या वादावादीच्या चर्चाही कायम रंगतात. सेहवागने आता शोएब अख्तरवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे, त्यामुळे शोएब भडकणार हे निश्चित आहे. शोएब अख्तर बॉल फेकायचा, त्याची बॉलिंग एक्शन योग्य नव्हती, हे शोएबलाही माहिती होतं, असं सेहवाग म्हणाला आहे. स्पोर्ट्स 18 चा शो होम ऑफ हिरोजमध्ये सेहवाग संजय मांजरेकरांसोबत (Sanjay Manjrekar) बोलत होता. ‘शोएबला माहिती होतं, त्याचं कोपर वाकायचं आणि तो बॉल फेकायचा. आयसीसीने त्याला ब्रेक का दिला असता? ब्रेट लीचा हात सरळ यायचा, त्यामुळे त्याचा बॉल पकडणं सोपं होतं. शोएबसोबत मात्र असं व्हायचं नाही. त्याचा हात कुठून येतोय आणि बॉल कुठून येईल हे कळायचं नाही,’ असं सेहवाग म्हणाला. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर शेन बॉण्डची बॉलिंग खेळणं सगळ्यात कठीण होतं, असं वक्तव्य सेहवागने केलं. ‘बॉण्डचा बॉल स्विंग होऊन शरीरामध्ये यायचा, जेव्हा तो आऊटसाईड ऑफ स्टम्प बॉलिंग करायचा. ब्रेट लीच्या बॉलिंगला मी कधीच घाबरायचो नाही. शोएब असताना तो काय करेल, हे कळायचं नाही. कदाचित बिमर येईल किंवा पायावर यॉर्कर टाकेल,’ अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, लक्ष्मण आणि गांगुली 150-200 बॉल खेळून शतक करायचे, मी जर एवढे बॉल खेळून शतकं केली असती तर मी कोणाच्याच लक्षात राहिलो नसतो. आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी मला जलद रन करणं गरजेचं होतं.