मुंबई, 7 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नचा (Shane Warne Death) थायलंडमध्ये मृत्यू झाला, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सोमवारी थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम (Postmortem) रिपोर्टबाबत माहिती दिली. शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक आहे, यामध्ये काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, असं थायलंड पोलिसांनी सांगितलं आहे. थायलंड पोलिसांकडून याप्रकरणाबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाला आहे. यामध्ये शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. पोलीस याबाबत लवकरच वकिलांशी बोलणार आहे. 52 वर्षांचा शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. 4 मार्चला संध्याकाळी त्याच्या निधनाचं वृत्त समोर आलं होतं. शेन वॉर्न एका व्हिलामध्ये थांबला होता, तिथल्याच रूममध्ये त्याला हृदयविकाराचा धक्का लागला. शेन वॉर्नला एम्ब्यूलन्सने रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्याचा मृत्यू झाला होता. थायलंड पोलिसांनी सुरूवातीपासूनच शेन वॉर्नच्या मृत्यूमध्ये काही संशयास्पद नसल्याचं सांगितलं होतं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पोलीस थांबले होते. तसंच पोलिसांनी शेन वॉर्नच्या तीन मित्रांचीही चौकशी केली होती. शेन वॉर्नच्या मॅनेजरनेही त्याच्या मृत्यूबाबत वक्तव्य केलं आहे. शेन वॉर्न सुट्टीवर जाण्याआधी दोन आठवडे द्रव आहार घेत होता, ज्यामुळे त्याच्या छातीत दुखत होतं आणि घाम येत होता, असं वॉर्नचे मॅनेजर जेम्स एर्सकिने यांनी सागितलं. नाईन नेटवर्कसोबत बोलताना एर्सकिने म्हणाले, ‘तो विचित्र डाएट करत होता. मागचे 14 दिवस तो द्रव आहार करत होता. त्याने असं तीन-चार वेळा केलं होतं. या डाएटमध्ये वॉर्न हिरवा आणि काळा ज्यूस प्यायचा. किंवा पांढरा बन आणि मस्का किंवा लसूण असलेला बन खायचा. संपूर्ण आयुष्यभर तो सिगरेट प्यायचा. मला वाटतं हृदय विकाराच्या धक्क्यानेच त्याचा मृत्यू झाला.’ मृत्यू व्हायच्या काही दिवसआधी वॉर्नने इन्स्टाग्रामवर त्याचा एक जुना फोटो शेयर केला होता. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, ऑपरेशन बारीक होणं सुरू आहे, असं कॅप्शन वॉर्नने या फोटोला दिलं होतं. वॉर्नच्या कुटुंबानेही थायलंड पोलिसांना त्याला हृदयविकार आणि अस्थमाचा त्रास असल्याचं सांगितलं.