मेलबर्न, 13 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याच्या मृत्यूला आता एका आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. थायलंडमध्ये 4 मार्चला हृदयविकाराचा धक्का लागल्यामुळे शेन वॉर्नचं निधन झालं होतं. यानंतर आता शेन वॉर्नची काऊन्सिलर पहिल्यांदाच समोर आली आहे. वॉर्नच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींबाबत तिने उलगडा केला आहे. लियान यंग (Lianne Young) ही शेन वॉर्नची काऊन्सिलर होती. द सनने दिलेल्या वृत्यानुसार शेन वॉर्न गेल्या काही काळापासून बराच खूश होता, तसंच आपण आणखी 30 वर्ष सहज जगू, असंही त्याला वाटत असल्याचं लियान यंगने सांगितलं. लियान यंग 2015 पासून शेन वॉर्नची काऊन्सिलर होती आणि त्याला रिलेशनशीप ऍडव्हाईज द्यायची. शेन वॉर्न त्याच्या भविष्याबाबत बरीच तयारी करत होता. मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी तो तीन महिन्यांच्या सुट्टीवर गेला होता. तब्येतीबाबत तो फार चिंतित नव्हता, आपण अजून 30 वर्ष जगू, असा विश्वास त्याला वाटत होता, अशी प्रतिक्रिया लियान यंगने दिली. जेव्हा मी शेन वॉर्नला प्रश्न विचारले तेव्हा तो खूप खूश होता, पण फॅट शेमिंग फोटोवरून मात्र तो निराश जाणवला. यानंतर तो 14 दिवसांच्या ज्यूस डाएटवर गेला. तो फिटनेसवर खूप लक्ष देत होता, असंही लियान यंग म्हणाली. शेन वॉर्न थायलंडमध्ये मित्रांसोबत सुट्टीवर गेला होता, तेव्हा एका व्हिलामध्ये त्याला हृदयविकाराचा धक्का लागला. सुट्टीच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्नचा मृत्यू झाला. थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नचं पोस्टमॉर्टम केलं, यात त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचं स्पष्ट झालं. शेन वॉर्नचं पार्थिव चार्टर विमानाने थायलंडहून ऑस्ट्रेलियात आणलं गेलं आहे. 30 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शेन वॉर्नच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी एक लाखांपेक्षा जास्त लोक यायची शक्यता आहे. शेन वॉर्नचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केले जाणार आहेत.