मेलबर्न, 10 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne Death) मागच्या आठवड्यात थायलंडमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. तो 52 वर्षांचा होता. वॉर्नचं पार्थिव गुरूवारी थायलंडहून ऑस्ट्रेलियाला रवाना झालं आहे. थायलंड विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. स्पेशल चार्टर विमानाने शेन वॉर्नचं पार्थिव ऑस्ट्रेलियाला रवाना करण्यात आलं आहे. भारतीय वेळेनुसार वॉर्नचं शरीर गुरूवारी सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी रवाना झालं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 30 मार्चला एमसीजीमध्ये अंत्यदर्शन 30 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) शेन वॉर्नचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल, यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. हे मैदान शेन वॉर्नच्या करियरमधल्या ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार आहे. व्हिक्टोरिया राज्याचे पंतप्रधान डॅनियल एंड्रयूजही वॉर्नच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं, यात त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं. तसंच यात काही संशयास्पद नसल्याचं थायलंड पोलिसांनी स्पष्ट केलं. थायलंडमधला द्वीप कोह समुईमधल्या एका व्हिलामध्ये वॉर्नचा मृत्यू झाला. रुग्णालयात नेल्यानंतर तिकडेच त्याला मृत घोषित करण्यात आलं. रविवारी वॉर्नचं शरीर सूरत थानीला नेण्यात आलं. सूरत थानीवरून पार्थिव राजधानी बँकॉकला आणण्यात आलं, यानंतर आता पार्थिव ऑस्ट्रेलियाला रवाना झालं आहे. एमसीजीवर शेन वॉर्नचं अंत्यदर्शन झाल्यानंतर कुटुंबिय वैयक्तिकरित्या त्याच्यावर अंत्यसंस्कार करतील. ‘वॉर्नला अखेरचा निरोप देण्यासाठी एमसीजीपेक्षा दुसरी जागा असू शकत नाही, असं पंतप्रधान एन्ड्रयूज म्हणाले. एमसीजीवरच वॉर्नने 1994 साली ऍशेस हॅट्रिक घेतली होती, तसंच 2006 साली आपल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सीरिजच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये वॉर्नने याच मैदानात 700वी विकेट घेतली. वॉर्नचा जन्मही मेलबर्नमध्ये झाला, याचठिकाणी तो लहानाचा मोठा झाला.