मुंबई, 30 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर-बॅटर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्विंटन हा क्रिकेट विश्वातील ख्यातनाम असा खेळाडू आहे. भारतात लोकप्रिय अशा आयपीएलच्या स्पर्धेत क्विंटन हा मुंबई इंडियन्स या सर्वात यशस्वी संघाकडून खेळतो. तो यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज आहे. त्यामुळे त्याचे दक्षिण आफ्रिकेसह भारत आणि जगभरात चाहते आहेत. या सर्व चाहत्यांसाठी क्विंटनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणं हा खरंतर खूप मोठा धक्काच आहे. ‘क्रिकेट दक्षिण आफ्रीके’ने याबाबट ट्विट करत माहिती दिली आहे. तर क्विंटनने कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे.
डी कॉकची पत्नी साशा हार्ली सध्या गर्भवती आहे. त्यांना जानेवारी महिन्यात बाळ होणार आहे. या बाळाच्या स्वागतासाठी आपल्याला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. कारण कुटुंबच आपलं सर्वस्व आहे. त्यामुळे आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत असल्याचं क्विंटनने म्हटलं आहे. क्विंटन डी कॉक नेमकं काय म्हणाला? “मी हा निर्णय सहज घेतलेला नाही. हा निर्णय घेण्याआधी मी प्रचंड विचार केला. मी माझ्या भविष्याचा भरपूर विचार केला. पण माझी पत्नी साशा आणि मी आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत. त्यामुळे आयुष्यात नेमकं कशाला प्राधान्य द्यावं, याबाबत मी भरपूर विचार केला. माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. आमच्या आयुष्यातील या नव्या आणि रोमांचक अध्यायात कुटुंबासोबत सहभागी होण्यासाठी मला वेळ हवा आहे”, असं क्विंटन डी कॉक म्हणाला आहे. हेही वाचा : लग्नाला आता 50 लोकांनाच परवानगी, नवीन नियमावली जाहीर “मला कसोटी क्रिकेटवर प्रेम आहे. मला मैदानावर देशाचं प्रतिनिधित्व करायला खूप आवडतं. मी आतापर्यंत क्रिकेटमध्ये बरेच उतार-चढाव अनुभवले. अनेकवेळा मिळालेल्या विजयानंतर सेलिब्रेशन केलं. तसेच कठीण परिस्थितीचाही सामना आणि संघर्ष केला. मला क्रिकेट खूप आवडतं. पण त्याही पलिकडे जावून खूप प्रेमळ असं काहीतरी मला गवसलं आहे. आयुष्यात आपण वेळ सोडून सारं काही विकत घेऊ शकतो. आता माझ्यासासाठी सर्वात महत्त्वाच्या माणसांसाठी योग्य ते करण्याची वेळ आलेली आहे”, असंदेखील तो म्हणाला. “मी माझ्या कसोटी क्रिकेट प्रवासाच्या सुरुवातीपासून भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. माझे प्रशिक्षक, संघातील सहकारी, विविध व्यवस्थापन संघ आणि माझे कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींना धन्यवाद. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी माझी कर्तबगारी दाखवू शकलो नसतो. माझ्या कारकिर्दीचा हा निश्चितच शेवट नाही. मी पांढर्या चेंडूच्या क्रिकेटसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी भविष्यात माझ्या क्षमतेनुसार माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करेन. भारताविरुद्धच्या या उर्वरित कसोटी मालिकेसाठी माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.