नवी दिल्ली, 27 मार्च : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कोरोनाग्रस्तांना दान केलेल्या रकमेवरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. धोनीने फक्त एक लाख रुपयांची मदत केली म्हणत चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. मात्र यानंतर धोनीची पत्नी साक्षी भडकली असून तिने ट्रोल करणाऱ्यांवर तिने नाराजी व्यक्त केली आहे. वर्षाला कोट्यवधींची कमाई कऱणाऱ्या धोनीने एवढीच मदत केल्यानंतर त्याच्यावर टीका झाली. आता यावर साक्षीने ट्विटरवरून उत्तर दिलं आहे. साक्षीने ट्विटरवर म्हटलं की, सर्वांना विनंती आहे अशा परिस्थितीत खोटी माहिती पसरवू नका. तुमची लाज वाटते. साक्षीच्या या ट्विटवरही उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.कोरोनाव्हायरसमुळे भारतात लॉकडाउनची घोषणा केली गेली. त्याचा थेट परिणाम मजुरीवर काम करणाऱ्यांच्या कुटुंबावर होत आहे. यामुळेच सर्व क्षेत्रातील दिग्गज लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहे. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने पुण्यातील मजुरांसाठी एक लाख रुपयांची मदत केली.
चाहत्यांनी, धोनीची वार्षिक कमाई 800 कोटी असून केवळ 1 लाख रुपये मदत केली हे खेदजनक, असे मत व्यक्त केले आहे. महेंद्रसिंग धोनीने ही रक्कम मुकुल माधव फाउंडेशन पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला Crowd फंडिंग वेबसाइटच्या माध्यमातून दिली आहे. या रकमेचा उपयोग पुणे येथील दैनंदिन वेतन मजुरांच्या कुटुंबीयांना रेशन वस्तू पुरवण्यासाठी केला जाईल. हे वाचा : वर्षाला 800 कोटी कमवणाऱ्या धोनीने कोरोनाग्रस्तांना दिले फक्त 1 लाख, चाहते भडकले धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही लिंक शेअर केली होती. धोनीच्या पुढाकारानंतर आणखी बरेच लोक मदतीसाठी पुढे आले असून आतापर्यंत 12 लाख रुपयांची मदत उभी करण्यात आली आहे. हे वाचा : पत्नीला कोरोनाचा धोका, सचिनच्या नावाने पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा क्रिकेटपटू