Mithali Raj
मुंबई, 08 जून : भारताची महान महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मिताली राज दीर्घकाळ भारतीय महिला क्रिकेटसाठी खेळत होती. परंतु, आता तिच्यावर क्रिकेट खेळाला अलविदा करण्याची वेळ आली (cricketer Mithali Raj retires) आहे. महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. मिताली राज ही न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकाचा शेवटचा भाग होती. परंतु, तिच्या नेतृत्वाखाली संघ उपांत्य फेरीपूर्वी बाहेर पडला. हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक असल्याचे बोलले जात होते. त्यातच आता तिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काही वर्षांपूर्वीच तिने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती. 26 जून 1999 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मिताली राजने मार्च 2022 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले योगदान दिले. यादरम्यान तिने 12 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 89 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 12 कसोटी सामन्यांमध्ये तिने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 699 धावा केल्या, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 7 शतके आणि 64 अर्धशतकांसह 7805 धावा केल्या. तर 17 अर्धशतकांच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये 2364 धावा केल्या. इन्स्टाग्रामवर भावनिक संदेश शेअर
बीसीसीआयचे आभार - मितालीने तिच्या पोस्टमध्ये बीसीसीआयसह इतर लोकांचे आभार मानले आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे तिच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला, तर दुसरीकडे अनेक जण तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत. बायोपिकमधील मिताली राजची भूमिका करणारी अभिनेत्री तापसी पन्नूने तिला शुभेच्छा दिल्या आहेत .