मुंबई, 24 जून : टीम इंडिया सध्या इंग्लड (India vs England) दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये 1 जुलैला बर्मिंघममध्ये टेस्ट मॅच होणार आहे. या मॅचच्या तयारीसाठी भारतीय टीम लिसेस्टरशायरविरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना खेळत आहे. गुरूवारी या सराव सामन्याचा पहिला दिवस होता. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण टीमची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी लवकर आऊट झाले. रोहितने 25, गिलने 21, विहारीने 3 आणि श्रेयस अय्यरने 0 रन केले. विराट कोहलीही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, तर रवींद्र जडेजालाही खास काही करता आलं नाही. भारताने 138 रनवरच 6 विकेट गमावल्या होत्या. आठव्या क्रमांकावर आलेल्या शार्दुल ठाकूरकडून (Shardul Thakur) चांगल्या खेळीची अपेक्षा करण्यात येत होती, पण तोही 6 रनवर आऊट झाला. रोमन वॉकरने शार्दुलला आऊट केलं. रोमनने टाकलेला इनस्विंग शार्दुलला समजला नाही. बॉल बाहेर जात असल्याचं वाटल्यामुळे शार्दुलने बॅट बाजूला केली, पण हा इन स्विंग थेट स्टम्पवर जाऊन आदळला. 43 व्या ओव्हरमध्ये शार्दुल 6 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताने 246/8 वर इनिंग घोषित केली. श्रीकर भरतने सर्वाधिक नाबाद 77 रन केले. याशिवाय विराट कोहलीने 33 आणि उमेश यादवने 23 रन केले. लिसेस्टरशायरकडून रोमन वॉकरने सर्वाधिक 5 विकेट मिळाल्या. विल डेव्हिसने 2 आणि प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत.