Kuldeep Yadav
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला क्रिकेट कसोटी सामना (India vs England) आज चेन्नईत सुरू झाला. ऑस्ट्रेलियाला हरवल्यानं सध्या भारतीय संघाचं (Indian Cricket Team) मनोबल उंचावलं आहे त्यामुळं इंग्लंडला हरवून या मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जिद्दीनं भारतीय संघ मैदानात उतरला आहे. चेन्नईतील सामन्यासाठी भारतीय संघात तीन स्पिनर्सचा समावेश करण्यात आला आहे; मात्र त्यात आघाडीचा स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याचा समावेश नाही. ही बाब क्रिकेट प्रेमी आणि क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनाही खटकली आहे. त्यामुळं त्याच्या चाहत्यांमध्ये आणि दिग्गज खेळाडूंमध्येही आश्चर्य व्यक्त होत असून, सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा होत आहे. चाहत्यांनी कमेंटस आणि मिम्सच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खबर इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. बराच काळ संघाबाहेर असलेला लेफ्ट आर्म स्पिनर कुलदीप यादव याला व्यवस्थापन समिती संघात स्थान देईल अशी अटकळ अगदी सामन्याच्या आदल्या दिवसापर्यंत होती. कारण चेन्नईतील एम. के. चिन्नास्वामी मैदान स्पिनर्सना साथ देतं असा इतिहास आहे. डाव्या हाताच्या मनगटाच्या सहायानं बॉल वळवण्यात तरबेज असल्यानं चायनामन (Chinaman) म्हणून ओळखला जाणारा कुलदीप यादव या स्टाईलमुळं या पिचवर इंग्लंडच्या संघासाठी मोठा धोका ठरला असता. तरीही त्याची निवड संघात झाली नाही. माजी क्रिकेटपटू मोहमद कैफनं कुलदीपची प्रशंसा करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दोन वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये कुलदीप यादव पहिल्या क्रमांकाची पसंती असलेला स्पिनर होता, आता तो संधी मिळण्यासाठी संघर्ष करत आहे. अश्विन आणि पंत या दोघांनीही अशा टप्प्याला हिमतीनं तोंड दिलं आहे, त्यामुळं प्रेरणा मिळवण्यासाठी यादवला दूर जाण्याची गरज नाही. कुलदीप धीर सोडू नको, खंबीर रहा! असं कैफनं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
हे देखील वाचा - Happy Birthday Bhuvneshwar Kumar: फक्त या एका माणसाने सचिन तेंडुलकरला केलं होतं शून्यावर गारद!
आकाश चोपडा यानं कुलदीप यादव खेळणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला आहे. भारतातील सर्वात यशस्वी नवीन बॉलर असतांनादेखील कुलदीप यादवला संघात स्थान मिळत नाही, त्यानं नेमकं काय करावं अशी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे. अश्विन आणि जडेजा असतानाच काय पण जडेजा असतानादेखील यादवला स्थान मिळत नाही. आता तर भारत होमपिचवर खेळत आहे, तरीही त्याला संधी नाही, मग तो खेळणार तरी कधी? असं आकाश चोप्रा यानं ट्विटरवर म्हटलं आहे.
‘नेटमध्ये बोलिंग करणाऱ्या बॉलर्सना किंवा स्टँड बाय असलेल्या बॉलर्सनाही संधी दिली जात आहे; पण कुलदीपला खेळवलं जात नाही. व्यवस्थापन समितीचा त्याच्यावर विश्वास नसेल तर त्याला मुक्त करावं म्हणजे तो किमान देशांतर्गत पातळीवर क्रिकेट खेळू शकेल,’ असं माजी क्रिकेटपटू दोड्डा गणेश यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना श्रीलंकेच्या एम्बुलडेनियाशी द्याव्या लागलेल्या झुंजीमुळे भारतीय संघात स्पिनर शहाबाज नदीमची निवड झाली हे स्पष्ट आहे. तो चांगला आणि अनुभवी स्पिनर आहे; पण कुलदीपसाठी काय याचा अर्थ आहे. सध्या व्यवस्थापन त्याला उच्च रेटिंग देत नाही, हेच यावरून सिद्ध होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
काही चाहत्यांनी मिम्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने कुलदीपचा फोटो टाकून त्यावर एकानं नॉन पर्फोर्मिंग अॅसेट अर्थात एनपीए बनून राहिलास नां! अशी कमेंट केली आहे.
तर एकानं तारे जमी पर चित्रपटातील मुलाचा फोटो टाकून ‘क्या मै इतना बुरा हू विराट, असं त्यावर लिहिलं आहे. कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्यानं चाहत्यांनी विविध कमेंटस आणि मिम्स द्वारे व्यवस्थापनाच्या निर्णयाबद्दल आश्चर्य, नाराजी व्यक्त केली आहे.