बँगलोर, 12 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर बॅटर क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) याला नवी आयपीएल टीम मिळाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) डिकॉकला 6 कोटी 75 लाख रुपये देऊन विकत घेतलं आहे. मागच्याच महिन्यात भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये क्विंटन डिकॉकने धमाकेदार कामगिरी केली होती. डिकॉकच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने भारताचा वनडे सीरिजमध्ये 3-0 ने पराभव केला होता. क्विंटन डिकॉक मागच्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) होता. आयपीएलमध्ये बराच काळ त्याने रोहितसोबत (Rohit Sharma) ओपनिंग केली. आयपीएलच्या 77 सामन्यांमध्ये त्याने 31.33 च्या सरासरीने 2,256 रन केले. यादरम्यान त्याने एक शतक आणि 16 अर्धशतकंही ठोकली. भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये डिकॉक सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. डिकॉकने त्याची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवली होती.
वनडे आणि टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्विंटन डिकॉकने नुकाताच टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. टेस्ट क्रिकेट खेळत नसल्यामुळे डिकॉक आयपीएलचा संपूर्ण मोसम खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मुंबईकडून खेळण्याआधी क्विंटन डिकॉक आरसीबीकडे होता, पण आरसीबीने 2018 साली 2.8 कोटी रुपयांमध्ये क्विंटनला मुंबई इंडियन्सना देऊन टाकलं. IPL Auction 2022 : गुजरातने खरेदी केला पहिला खेळाडू, नेहारानं निवडला जुना सहकारी 2019 सालच्या मोसमात त्याने 529 रन आणि 2020 साली 503 रन केले. क्विंटन डिकॉकच्या या कामगिरीमुळे मुंबईने हे दोन्ही मोसम आयपीएल ट्रॉफी पटकावली. 2021 च्या आयपीएलमध्ये मात्र डिकॉकला सूर गवसला नाही, याचा फटका मुंबईलाही बसला. आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईला मागच्या मोसमात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळालं नाही.