विराटचं BCCIला पत्र, गंभीर सोबतच्या वादावर आपली बाजू मांडत म्हणाला...
मुंबई, 6 मे : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेला वाद काही केल्या शांत होण्याचं नाव घेत नाही. हा वाद होऊन पाच दिवस उलटून देखील सोशल मीडियावर अजूनही याबाबत चर्चा आणि ट्रोलिंग सुरु आहे. अशातच विराट कोहलीने गंभीर सोबतच्या वादानंतर बीसीसीआयला पत्र लिहून आपली बाजू मांडल्याची माहिती मिळत आहे. 1 मे रोजी आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात वाद झाला होता. मॅच दरम्यान झालेलया वाद लक्षात घेऊन नवीनने मॅच नंतर दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना विराट कोहली विषयी अपशब्द वापरून त्याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरने नवीन उलची बाजू घेऊन विराट नवीनच्या वादात उडी घेतली. त्यामुळे नवीन आणि विराट मधील भांडण बाजूला राहून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वादावादी झाली.
विराट गंभीरमध्ये झालेल्या वादानंतर बीसीसीआयने दोघांवर मॅच फीच्या 100 टक्के तर नवीन उल हकला 25 टक्के दंड ठोठावला. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने केलेल्या दंडात्मक कारवाईनंतर विराटने बीसीसीआयला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार विराटने बीसीसीयाला पत्र लहून वादाच्या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे. विराटने पत्रात नमूद केले आहे की, त्याने काहीही चुकीचे केले नाही आणि त्याने मॅच दरम्यान नवीन उल हक किंवा गौतम गंभीरशी असे काहीच वर्तन केले नाही की ज्यासाठी त्याला इतका मोठा दंड ठोठावण्यात यावा. मॅचच्या 100 टक्के दंड आकारण्यात आल्याने विराटने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. आयपीएलमधील 100 टक्के मॅच फी नुसार कोहलीकडून 1.25 कोटी रुपयांचा दंड बीसीसीआय आकारणार आहे. परंतु हा दंड थेट कोहलीच्या पगारातून नाही तर आरसीबी फ्रेंचायझीकडून वसूल केला जाणार आहे. विराटने दिलेल्या पत्रावर बीसीसीआय विचार करून कारवाई मागे घेते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.