विराटशी वाद घालणारा नवीन उल हक कोण? शाहिद अफ्रिफीसोबत ही केलेलं भांडण
मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मधील 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने लखनऊ सुपर जाएंट्सवर विजय मिळवला होता. परंतु या सामन्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक यांच्यात झालेला वाद सर्वाधिक चर्चेत राहिला. लखनऊचा गोलंदाज नवीनने विराट कोहलीसोबत वाद घातला आणि त्यात गौतम गंभीरने उडी घेतल्याने मैदानावरील वातावरण गरम झाले होते. अशातच विराट कोहली सोबत भांडण करणारा नवीन उल हक नक्की कोण याविषयी चर्चा आहे. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक आणि मेंटॉर गौतम गंभीर हे दोघे विराट कोहलीशी भिडल्याचे पाहायला मिळाले. लखनऊ सुपर जाएंट्सच्या फलंदाजीवेळी १७ व्या ओव्हरमध्ये विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामन्यानंतर झालेल्या वादामुळे विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हक या तिघांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नवीन उल हक कोण आहे? अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने लखनौ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा तो अफगाणिस्तानचा सहावा खेळाडू आहे. नवीन उल हकची टी-२० कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 34 विकेट घेतल्या आहेत. लखनौ संघाला नवीन-उल-हककडून मोठ्या आशा होत्या. त्या आशेप्रमाणेच नवीन उल हकने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 3 विकेट्स पटकावल्या.
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी सोबत देखील झाला होता वाद : श्रीलंका प्रिमियर लीगमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीसोबतही नवीन उल हकचा वाद झाला होता. नवीन-उल-हकनं मोहम्मद आमीरप्रती अपशब्द वापरले त्यानंतर दोघंमध्ये वाद झाला होता.
तसेच सामना संपल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू एकमेकांशी हात मिळवत होते, तेव्हा आफ्रिदीनं नवीन-उल-हकला त्याच्या आक्रमकपणामुळे झापलं होत. नवीन समोर येताच आफ्रिदीचा रागाचा चढला आणि त्याने नवीनला क्या हो गया? असं विचारल. पुढे तो हेही म्हणाला, मी पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले तेव्हा तुझा जन्मही झाला नव्हता.