गुजरात टायटन्सचा पंजाबवर विजय
मोहाली, 13 एप्रिल : आयपीएलच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातचा रोमांचक विजय झाला आहे. शेवटच्या 2 बॉलला 4 रनची गरज असताना राहुल तेवातियाने सॅम करनच्या पाचव्या बॉलवर फोर मारून गुजरातला विजय मिळवून दिला. या सामन्यात पंजाबने गुजरातला विजयासाठी 154 रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने धडाक्यात सुरूवात केली. ऋद्धीमान साहा आणि शुभमन गिल या ओपनरनी 4.4 मध्ये 48 रनची पार्टनरशीप केली. ऋद्धीमान साहा 19 बॉलमध्ये 30 रन करून आऊट झाला. तर गिलने 49 बॉलमध्ये 67 रनची मॅच विनिंग खेळी केली. गुजरातने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. पंजाबकडून अर्शदीप, रबाडा, ब्रार आणि करन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर पंजाबची सुरूवात अत्यंत खराब झाली. मॅचच्या दुसऱ्याच बॉलला प्रभसिमरन सिंग शून्य रनवर आऊट झाला, यानंतर शिखर धवनलाही 8 रनवर माघारी परतावं लागलं. मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक 36 रन केले, याशिवाय राजपक्षेने 20, जितेश शर्माने 25, सॅम करनने 22 आणि शाहरुख खानने 22 रन केले. गुजरातकडून मोहित शर्माला 2 विकेट मिळाल्या, तर शमी, लिटील, जोसेफ आणि राशिद खान यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 4 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला.