टिम भाऊ आला रे! ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडची मुंबई इंडियन्समध्ये थाटात एंट्री
मुंबई, 25 मार्च : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च रोजी आयपीएलच्या 16 व्या सीजनचा पहिला सामना पारपडणार असून यंदा 10 संघ आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची मैदानात उतरणार आहेत. अशातच आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघामध्ये टिम डेव्हिडची मराठमोळ्या अंदाजात एंट्री झाली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर टिम डेव्हिड आयपीएल 2023 साठी मुंबईच्या संघात सहभागी झाला आहे. मुंबई इंडियन्सने टिम डेव्हिडच्या एंट्रीचा व्हिडिओ शेअर केला असून यात डेव्हिड मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. डेव्हिडचे मुंबई संघात आगमन होताच त्याचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्याला नारंगी रंगाचा फेटा परिधान करण्यात आला असून व्हिडिओला मराठीतील सुपरफिट गाणं “ऐका दाजीबा” च बॅकग्राउंड म्युझिक देण्यात आलं आहे.
मुंबई इंडियन्सने टिम डेव्हिडच्या या व्हिडिओला “टिम भाऊ आला रे” असं कॅप्शन दिल आहे. टीम डेव्हिडने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत जवळपास 9 सामने खेळले असून आणि 31.17 च्या सरासरीने 187 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर 46 आहे. आयपीएल लिलाव 2023 मध्ये, मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले.