टॉस रोहित शर्माने जिंकला पण निर्णय पंजाबच्या कर्णधाराने घेतला, रोहितच्या या कृतीने मैदानावर पिकला हशा
मुंबई, 3 मे : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या विसरभोळ्या स्वभावाची प्रचिती न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यात सर्वांसमोर आली होती. असाच काहीसा प्रकार पुन्हा आयपीएल 2023 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या सामन्यातही घडला. यात मुंबईचा कर्णधार रोहितने टॉस जिंकला पण यानंतर कोणता निर्णय घ्यायचा हा निर्णय मात्र पंजाबचा कर्णधार शिखर धवनने घेतला. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2023 चा 46 वा सामना पारपडला. या सामन्याच्या अर्धातास पूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि पंजाबचा कर्णधार शिखर धवन यांच्यात टॉस झाला. हा टॉस रोहित शर्माने जिंकला परंतु टॉस जिंकून प्रथम फलंदाजी की गोलंदाजी निवडावी याबाबत त्याने शिखर धवनशी चर्चा करून निर्णय घेतला.
झालं असे की मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यावर त्याने शेजारी उभ्या असलेल्या शिखर धवनला, काय घेऊ सांग? असं विचारलं. यावर हसत धवनने रोहितला गोलंदाजी घेण्याचा सल्ला दिला आणि रोहितने देखील आम्ही प्रथम गोलंदाजी निवडत आहोत असा निर्णय जाहीर केला. रोहित आणि शिखर धवनमधील या कृतीने मैदानावर एकच हशा पिकला. रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री असून दोघांनी भारतासाठी अनेक सामन्यात सलामी फलंदाज म्हणून भूमिका बजावली आहे.