के एल राहुल आयपीएलमध्येही फ्लॉप! सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ
मुंबई, 1 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. आयपीएल 2023 चा तिसरा सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु आहे. परंतु आयपीएलमध्ये देखील के एल राहुलचा खराब फॉर्म त्याची पाठ सोडताना दिसत नाही. सलामीसाठी मैदानात आलेला के एल राहुल केवळ 8 धावा करून बाद झाला. भारताचा स्टार क्रिकेटर के एल राहुल सध्या खराब फॉर्मातून जात आहे. मागील काळात भारताकडून अनेक सामने खेळताना के एल राहुल स्वस्तात बाद झाला. के एल राहुलचा हा फॉर्म आयपीएलमध्ये सुधारेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना होती परंतु असे काहीही घडताना दिसत नाही. लखनौ सुपर जाएंट्सच्या होम ग्राउंडमध्ये सुरु असलेल्या सामन्यात के एल राहुल पुन्हा फलंदाजीत फ्लॉप होताना पाहायला मिळाला. सलामीची मैदानात आलेल्या के एल राहुलला दिल्ली संघाच्या चेतन साकरीया याने बाद केले.
चेतन साकरीया याने चौथ्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर के एल राहुलची विकेट घेतली. चेतन साकरीयाने टाकलेल्या चेंडूवर राहुलने शॉट मारण्याचा प्रयन्त केला. परंतु याचवेळी अक्षर पटेलने त्याचा झेल पकडला. के एल राहुलने संघासाठी 12 चेंडूत केवळ 8 धावा केल्या. कर्णधार के एल राहुलला संघासाठी दुहेरी आकडा देखील गाठता न आल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. राहुल विषयी अनेक मिम्स देखील शेअर केले जात असून यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.