यशस्वी जयस्वालची ही चूक राजस्थान रॉयल्सला महागात पडली, Video
मुंबई, 5 मे : आयपीएल 2023 मध्ये 48 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने राजस्थानवर 9 विकेट्सने विजय मिळवला तर राजस्थान रॉयल्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर लाजिरवाणा पराभव झाला. या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची एक चूक संघाला महागात पडली. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना राजस्थान येथील स्वामी मानसिंह इंदूर स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांची जोडी फलंदाजीसाठी मैदानात आली. परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने बटलरची विकेट घेतली. संघाची धाव संख्या अवघ्या 11धावांवर असताना कर्णधार संजू सॅमसन मैदानात आला.
संजू सॅमसनने यशस्वी सोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु यशस्वीच्या एका चुकीमुळे पॉवर प्लेमध्ये राजस्थानला अजून एक विकेट गमवावी लागली. झालं असं की, पॉवर प्लेमध्ये शेवटची ओव्हर टाकण्यासाठी राशीद खानला गोलंदाजी देण्यात आली. यावेळी कर्णधार संजू सॅमसन स्ट्राईकवर होता, संजूने तो चेंडू टोलवला पण, तिथे अभिनव मनोहरने चांगले क्षेत्ररक्षण करून बॉल अडवला.
संजूचे सर्व लक्ष चेंडूकडे होते, परंतु तोवर नॉन स्ट्रायकरवर असलेल्या यशस्वीने तोपर्यंत धाव घेतली आणि तो स्ट्राईकवर असलेल्या संजू सॅमसनजवळ पोहोचला. यावेळी यशस्वीची अतिघाई महागात पडली आणि मोहित शर्माने चेंडू लगेच राशीद खानकडे टाकला आणि यशस्वी अवघ्या १४ धावांवर रन आऊट झाला. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये राजस्थानने २ विकेट घालवून ५० धावा केल्या होत्या. यशस्वीची ही विकेट राजस्थान रॉयल्सला महागात पडली.