'या' कारणाने विराट नवीनमध्ये झाला वाद, मैदानातील व्हिडिओ आला समोर
मुंबई, 2 मे : आयपीएल 2023 मधील 43 व सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात पारपडला. या सामन्यानंतर मैदानावर विराट कोहली, नवीन उल हक आणि गौतम गंभीर या तिघांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या विराट आणि नवीन या दोघांमधील भांडणाने सामन्यानंतर रौद्र रूप घेतले. परंतु या दोघांमधील वाद नेमका कोणत्या कारणाने झाला हे सांगणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. 1 मे रोजी लखनऊचे होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने लखनऊवर 18 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर मैदानावर आरसीबीचा उप कर्णधार विराट कोहली आणि लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक यांच्यात वाद झाला. तर या वादात लखनऊ संघाचा मेंटॉर गौतम गंभीरने उडी घेतल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आणि गौतम गंभीर आणि विराटमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. अखेर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी विराट आणि गंभीरला एकमेकांपासून दूर केल्याने हा वाद शांत झाला.
परंतु नक्की विराट कोहली आणि नवीन उल हकमध्ये कोणत्या कारणामुळे भांडण झाले याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु असतानाच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. झालं असं की लखनऊ सुपर जाएंट्सच्या फलंदाजीवेळी 17 व्या ओव्हरमध्ये विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली. ज्यामध्ये अमित मिश्रा हस्तक्षेप केला आणि नंतर अंपायर्सने येऊन प्रकरण शांत केले. पुढच्या ओव्हरमध्ये, ब्रॉडकास्टरने पूर्ण फुटेज मोठ्या स्क्रीनवर दाखवले, जिथे कोहली काहीतरी बोलत होता आणि नवीन त्याला प्रत्युत्तर देताना दिसला. कोहली काही बोलला आणि मग नवीनकडे निशाणा करत आपला बूट दाखवला.
संबंधित व्हिडिओत विराट नक्की काय बोलला हे स्पष्ट झाले नसले, तरी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ वरून विराट नवीनला त्याच्या पायाखालची धूळ म्हणाला असा अंदाज नेटकऱ्यांकडून लावला जात आहे. तसेच या वादानंतर नवीनने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत लिहिलेल्या गोष्टींचा देखील या व्हिडिओ सोबत संबंध लावला जात आहे. यात नवीन उल हकने म्हंटले, " सल्ला घेण्यासाठी आणि आदर देण्यासाठी नेहमी तयार आहे, क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ आहे पण कोणी म्हणत असेल की तुम्ही सर्व माझ्या पायाची धुळ आहात आणि तिथेच राहा तर तो केवळ माझ्याबद्दल नाही तर माझ्या लोकांबद्दल देखील बोलत आहे". काही नेटकरी व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये विराट नवीनला पायाखालची धूळ म्हणाला असा अंदाज लावत असले तरी काही जण या व्हिडिओ मध्ये विराट कोहली खराब पीच बद्दल बोलत असल्याचे सांगत आहेत.