क्रिकेट स्टेडियम बनला कुस्तीचा आखाडा, दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्यात प्रेक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
मुंबई, 30 एप्रिल : जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा सीजन आता रंगात येऊ लागला आहे. काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2023 चा 40 वा सामना पारपडला. या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. परंतु या सामन्या दरम्यान स्टेडियममध्ये मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पारपडलाशनिवार असल्याने या सामन्याला प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती. प्रेक्षक आपल्या आवडत्या टीमला चिअर करत होते. दरम्यान या सामन्यात हैद्राबादने दिल्लीचा 9 धावांनी दारुण पराभव केला. यानंतर मॅच पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा विडिओ शनिवारी झालेल्या दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्याचाच असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओत सामना सुरु असताना दोन गटात हाणामारी झाल्याचे चित्र दिसत आहे. ज्यात काही व्यक्ती एका गटातील व्यक्तींना लाथा बुक्या घालून मारत आहे. व्हिडिओमध्ये 3-4 तरुण एकमेकांना बेदम मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या प्रेक्षकांमध्ये वाद कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.