कोच होता खेळाडूच्या विरोधात, पण त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला धोनी, आज तोच खेळाडू आहे CSK चा ट्रंप कार्ड
मुंबई, 29 मे : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएल 2023 ची फायनल मॅच होणार आहे. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार असून हा महामुकाबला पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्या काही वर्षांत आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीला सावरण्याचे काम केले आहे. दीपक चहर हा देखील असाच एक खेळाडू आहे. चेन्नई टीमचा मुख्य गोलंदाज झाल्यापासून दीपक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. दुखापतीचा काळ सोडला तर IPL 2023 मध्येही दीपकची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने 9 सामन्यात 21 च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. दीपक चहरनेही गुजरात टायटन्स विरुद्धच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि 29 धावा देत 2 विकेट घेतल्या. आयपीएल 2023 च्या फायनलपूर्वी, दीपकने एका मुलाखतीत त्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, टीमचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन धोनीने त्याला 2018 च्या आयपीएलमध्ये टीममध्ये घेऊन खेळण्याची संधी दिली होती. बॅट्समन म्हणून मिळाली संधी : ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या शोमध्ये दीपकने हा किस्सा शेअर केला. दीपक म्हणाला, “जेव्हा मी माही भाईला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मी फलंदाजी करत होतो, आणि पुण्याच्या संघात आलो होतो. माझ्या फलंदाजीमुळे स्टीफन फ्लेमिंगने माझी निवड केली. संघाच्या प्रॅक्टिस मॅच दरम्यान एक सराव सामना होता. ज्यात मी ५ षटकार मारले होते. पण ते करताना माझ्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यानंतर आयपीएलच्या त्या मोसमात मी जास्त सामने खेळले नाहीत. पुढच्याच वर्षी स्टीव्हन स्मिथ पुणे संघाचा कर्णधार झाला आणि वर्षभर मी 12 वा खेळाडू राहिलो.
जेव्हा धोनीने दीपकसाठी प्रशिक्षकाचा निर्णय केला अमान्य : दीपक चहर पुढे म्हणाले, “2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे पुनरागमन झाले. धोनी संघाचा कर्णधार झाला आणि मला चेन्नईने लिलावात विकत घेतले होते. पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनबाबत नियोजन सुरू होते. प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना मला काही सामन्यांनंतर प्लेइंग ११ मध्ये खेळवायचे होते. पण फ्लेमिंगच्या निर्णया विरोधात जाऊन धोनीने दीपक चहर सीजनमधील सर्व 14 सामने खेळणार असे स्पष्टपणे सांगितले. टीमच्या सीईओने स्वत: मला सांगितले की जेव्हा कर्णधार, प्रशिक्षक आणि बाकीचे टीम मॅनेजमेंट सीजनसाठी संघ ठरवण्याकरता बसले तेव्हा माझे नाव प्रथम लिहिण्यात आले होते”.