मुंबई, 15 मे : एमएस धोनीसाठी (MS Dhoni) आयपीएल 2022 चा हंगाम खूपच वाईट गेला. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) चालू मोसमात रविवारी 9वा पराभव झाला. ही संघाची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. गुजरात टायटन्स (CSK vs GT) विरुद्ध, CSK ने प्रथम खेळताना 5 विकेट गमावत 133 धावा केल्या. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 3 गडी गमावून लक्ष्य गाठले. ऋद्धिमान साहाने नाबाद 67 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरातचा 13 सामन्यांमधला हा 10वा विजय आहे. या विजयाने गुजरातची टॉप-2 मधील स्थान निश्चित झालं आहे. म्हणजेच संघ आता थेट क्वालिफायर-1 मध्ये प्रवेश करेल. या सामन्यात सीएसकेने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानाला संधी दिली. या 19 वर्षीय वेगवान गोलंदाजाची अॅक्शन माजी अनुभवी लसिथ मलिंगासारखीच आहे. इतिहास रचत त्याने टी-20 लीगमधील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याने गुजरातचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला बाद केले. सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, पथिराना चांगला खेळाडू आहे. त्याची अॅक्शन अगदी मलिंगासारखीच आहे. त्याचा संथ चेंडू खूप चांगला आहे.
2 बळी आणि 8 चेंडूत एकही धाव नाही मथिशा पथिराना अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही दिसला आहे. त्याने सामन्यात 3.1 षटके टाकली. 24 धावांत 2 बळी घेतले. त्याच्या 8 चेंडूत एकही धाव झाली नाही. या सामन्यापूर्वी त्याने फक्त 2 टी-20 सामने खेळले होते आणि 2 बळी घेतले होते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या दुखापतीनंतर संघाने त्याचा संघात समावेश केला होता. पण, धोनीच्या बोलण्यावरून तो अधिक काळ संघात राहू शकतो हे स्पष्ट होते. एमएस धोनी म्हणाला की प्रथम फलंदाजी करणे सोपे नव्हते. पूर्वार्धात वेगवान गोलंदाजांशिवाय फिरकीपटूंविरुद्ध धावा काढणे कठीण होते. एकंदरीत, आम्ही येत्या सामन्यांमध्ये काही नवीन खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. या सामन्यात संघाने प्लेइंग-11 मध्ये 4 बदल केले होते.