नवी दिल्ली: आयपीएल टी-20 क्रिकेट (IPL 2020) स्पर्धेचा तेरावा सिझन आत्ताच संपला. या स्पर्धेचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI Vs DC) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये रंगला होता. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पाच गडी राखून पराभव करत पाचव्यांदा विजतेपदाचा मान पटकावला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचा प्रवास खूपच वेगळा होता. बरेच मोठे खेळाडू फ्लॉप ठरले, तर काही युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली व सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत काही खेळाडू असे होते ज्यांनी क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनाही प्रभावित केलं. यामध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोरमधील देवदत्त पडिक्क्ल अव्वलस्थानी आहे. IPL 2021 मध्ये देवदत्तप्रमाणेच इतरही काही खेळाडूंची नावं प्रथम घेण्यात येण्याची शक्यता आहे. चला तर मग अशा पाच खेळाडूंवर नजर टाकूया ज्यांना पुढच्या आयपीएल लिलावात प्राधान्य दिलं जाऊ शकतं. राहुल त्रिपाठी KKR (कोलकत्ता नाइट रायडर्स): अर्थातच राहुल त्रिपाठी हा अव्वल आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा नसला तरी कोलकत्ता नाइट रायडर्समधील त्याचा सहभाग हा खूपच चांगला होता. अकरा सामन्यांत राहुलने 23.00 सरासरीने आणि 127.07 च्या स्ट्राईक रेटने 230 धावा केल्या. वरुण चक्रवर्ती KKR (कोलकत्ता नाइट रायडर्स): मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती हा कोलकत्ता नाइट रायडर्सतर्फे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू ठरला. दिल्ली कॅपिटलविरुद्धच्या सामन्यात वरूणने पाच विकेट घेतल्या. 13 सामन्यांत चक्रवर्तीने 6.84 च्या इकॉनॉमीने 17 गडी बाद केले. तो भारतीय टी-20 संघासोबत ऑस्ट्रेलियात जाणार होता. परंतु त्याच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावं लागलं. तर त्याच्या जागी टी. नटराजन यांला भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. देवदत्त पडिक्कल RCB (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर): देवदत्त या आयपीएल टी-20 च्या या सामन्यांमध्ये चांगला खेळला. आरसीबी तसेच बीसीसीआयच्या दृष्टिनीही नवं टॅलेंट म्हणून देवदत्तकडे बघितलं जातंय. देवदत्तने इमर्जिंग प्लेयर ऑफ आयपीएलचा मान देखील पटकावला आहे. या 15 सामन्यांमध्ये त्याने 31.53 च्या सरासरीने आणि 124.80 च्या स्ट्राइक रेटने 473 धावा केल्या. यादरम्यान त्याने एकूण पाच अर्धशतकं केली. ऋतुराज गायकवाड CSK (चेन्नई सुपर किंग्स): महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल टी-20 चे हे सामने खूपच खराब झाले. परंतु या मोसमात ऋतुराजची चांगली चर्चा झाली. तीन डाव खेळल्यानंतर तो प्लेइंग 11 मधून बाहेर पडला. परंतु तो पुन्हा संघात आला आणि त्यानी सलग तीन अर्धशतकं केली ऋतुराजने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये सहा सामन्यांमध्ये 51.00 च्या सरासरीने आणि 120.71 च्या स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या. कार्तिक त्यागी RR (राजस्थान रॉयल्स): भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यानी या सामन्यांमधील बेस्ट युवा वेगवान गोलंदाजाचा मान पटकावला. 10 सामन्यांत कार्तिकने 9.61 सरासरीने 9 गडी बाद केले. तो एक उत्कृष्ट भारतीय वेगवान गोलंदाज ठरला ज्याचे बाउन्सर अनुभवी खेळाडूंनाही खेळता आले नाहीत. तर राजस्थान रॉयल्ससाठी आता आणि भविष्यातही तो एक उत्कृष्ट खेळाडू ठरू शकतो असं त्याच्याबद्दल म्हटलं जात आहे.