IND vs NZ
कानपूर, 26 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा पहिला डाव 345 धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली. न्यूझीलंडने दुसरे आणि तिसरे सत्र यशस्वीरित्या खेळून काढत बिनबाद 129 धावा करून दुसरा दिवस आपल्या नावावर केला. विल यंग आणि टॉम लॅथम क्रीझवर आहेत. पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंड सध्या भारतापेक्षा 216 धावांनी मागे आहे. पाहुण्या संघाने वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या 5 विकेट्सच्या जोरावर भारताचा डाव 345 धावांत संपुष्टात आणला. श्रेयस अय्यर आपल्या कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 16 वा भारतीय फलंदाज ठरला, त्याने 105 धावा केल्या. रविचंद्रन अश्विन वगळता खालच्या फळीतील फलंदाजांना न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. अश्विनने 56 चेंडूत 38 धावा केल्या. वेगवान गोलंदाजांना सकाळी खेळपट्टीवरून अधिक उसळी मिळाली, त्यामुळे सौदीने 4 विकेट घेतल्या. दुसरीकडे अश्विन आणि जडेजासारख्या फिरकीपटूंना टर्न मिळाले नाही. विल यंग आणि लॅथम यांनी मिळून पाहुण्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी आपापली अर्धशतकं पूर्ण केली आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतर नाबाद परतले. विल यंग 180 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 75 धावा तर टॉम लॅथम 165 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 50 धावा करत खेळत होता. भारतासाठी इशांत शर्माने 6 षटके टाकली आणि फक्त 10 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय उमेश यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 10 षटके टाकली, तर रविचंद्रन अश्विनने 17 आणि रवींद्र जडेजाने 14 षटके टाकली. तत्पूर्वी, अय्यरने कालच्या 75 धावांच्या पुढे खेळताना 171 चेंडूत 105 धावा केल्या. पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. या यादीत लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, माजी कर्णधार सौरव गांगुली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत. सकाळच्या सत्रात 81 धावा झाल्या पण 4 विकेटही पडल्या. हे सत्र सौदीच्या नावावर होते, ज्याने २७.४ षटकांत ६९ धावांत ५ बळी घेतले. आपली 80वी कसोटी खेळणाऱ्या सौदीने तेराव्यांदा हा पराक्रम केला आहे. त्याने प्रथम दुसऱ्या नवीन चेंडूवर जडेजाला बाद केले, तो केवळ 50 च्या वैयक्तिक धावसंख्येवर परतला.