अहमदाबाद, 9 मार्च : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनने (Shikhar Dhawan) विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये शानदार कामगिरी केली. यानंतर आता तो इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) टी-20 सीरिजमध्ये धमाका करण्यासाठी तयार आहे. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये धवनने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता इंग्लंडविरुद्ध धवन त्याचा ओपनिंग पार्टनर रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे. पण टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी धवनऐवजी राहुलने (KL Rahul) ओपनिंग करावी, असा सल्ला दिला आहे. भारताने टी-20 सीरिजसाठी 19 खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी टीमकडे दोन पर्याय आहेत. याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 वर्ल्ड होणार आहे. त्याआधी विराट कोहली आणि रवी शास्त्री संतुलित टीम तयार करण्याचा प्रयत्न करतील. ‘ओपनिंगला रोहितसोबत केएल राहुलने खेळावं. मागच्या काही महिन्यांपासून भारतीय टीम केएल राहुलसोबतच गेली आहे आणि त्यानेही चांगली कामगिरी केली. राहुलने शिखर धवनसोबतही ओपनिंग केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला दुखापत झालेली असताना राहुलच ओपनिंगला खेळला,’ असं लक्ष्मण म्हणाला. आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान फक्त राहुलच्या पुढे आहे. ‘आयपीएलमध्ये धवनची कामगिरी उत्कृष्ट होती. वरच्या फळीत खेळताना त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी आणि मग विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने शतकं केली. पण तरीही मी केएल राहुलवर विश्वास ठेवेन,’ अशी प्रतिक्रिया लक्ष्मणने दिली.