मुंबई, 24 जून : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मॅचआधी भारतीय (India vs England) टीम आणि लिसेस्टरशायर यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजारासह (Cheteshwar Pujara) भारतीय टीमचे 4 खेळाडू विरोधी टीम लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत. या 4 दिवसांच्या सामन्यात पुजारा मोठी खेळी करेल, असं वाटत होतं, पण तो शून्य रनवर आऊट झाला. मोहम्मद शमीच्या (Mohammad Shami) बॉलिंगवर पुजारा बोल्ड झाला. पुजाराची विकेट घेतल्यानंतर शमीने जोरदार सेलिब्रेशन केलं, एवढच नाही तर त्याने पुजाराच्या खांद्यावर हात ठेवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारताने 246/8 वर इनिंग घोषित केली. श्रीकर भरतने सर्वाधिक नाबाद 77 रन केले. याशिवाय विराट कोहलीने 33 आणि उमेश यादवने 23 रन केले. लिसेस्टरशायरकडून रोमन वॉकरने सर्वाधिक 5 विकेट मिळाल्या. विल डेव्हिसने 2 आणि प्रसिद्ध कृष्णाने 1 विकेट घेतली.
काऊंटीमध्ये चमकला पुजारा चेतेश्वर पुजाराने यावर्षाच्या काऊंटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं. काऊंटी चॅम्पियनशीप डिव्हिजन-2 च्या 5 सामन्यांमध्ये त्याने 120 च्या सरासरीने 720 रन केले. यात त्याने चार शतकं झळकावली, ज्यात 2 द्विशतकं होती. तसंच एका सामन्यात तो 170 रनवर नाबाद राहिला. 34 वर्षांच्या चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत 95 टेस्ट मॅचच्या 43.87 च्या सरासरीने 6,713 रन केल्या आहेत. त्याच्या नावावर 18 टेस्ट शतकं आणि 32 अर्धशतक आहे. नाबाद 206 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे.