के एल राहुल पुन्हा फ्लॉप! अवघी 1 धाव करून बाद
मुंबई, १९ फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्ली येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फलंदाजी करून भारतासमोर 115 धावांच आव्हान ठेवलं आहे. परंतु हे आव्हान पूर्ण करत असताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा फलंदाज के एल राहुल पुन्हा त्याच्या वाईट फॉर्मामुळे पुन्हा फ्लॉप ठरला आहे. दुसऱ्याच षटकात तो नाथन लायनच्या गोलंदाजीचा शिकार ठरला असून तो 3 चेंडूत अवघी 1 धाव करू शकला. गेल्या काही सामान्यांपासून केएल राहुल सतत फ्लॉप ठरत आहे. नागपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही राहुल भारतासाठी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. राहुलचा हाच खराब फॉर्म दिल्ली येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातही सुरु राहिला. पहिल्या डावात राहुल रोहित शर्मासोबत फलंदाजीसाठी उतरला परंतु अवघ्या 17 धावा करत माघारी परतला. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने त्याची विकेट घेतली. तर आज पुन्हा दुसऱ्या डावात के एल राहुल नाथन लायनच्या गोलंदाजीचाच शिकार ठरला. राहुल चा हा सतत होणारा फ्लॉप शो पाहून आता नेटकरी संतापले आहेत. सोशल मीडियावर के एल राहुलला भारतीय संघाच्या प्लेयिंग 11 मधून बाहेर काढण्याचा सल्ला क्रिकेटचे चाहते देत आहेत. यावर सोशल मीडियावर अनेक मिम्स देखील शेअर केले जात आहेत.
नेटकरी के एल राहुलवर सोशल मीडियावर अनेक मिम्स शेअर करत असून यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.