हरमनप्रीत कौरवर ICC कडून मोठी कारवाई!
मुंबई, 25 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात शनिवारी वनडे सिरीज खेळवण्यात आली होती. शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना टाय झाला. परंतु हा सामना भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या एका कृतीमुळे चांगलाच वादग्रस्त ठरला. या सामन्यादरम्यान हरमनप्रीतच्या वागणुकीवर आक्षेप घेऊन आयसीसीने तिच्यावर मोठी कारवाई केली आहे. काय आहे प्रकरण ? भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील खेळवण्यात आलेल्या सीरिजच्या अखरेच्या सामन्यात भारताची बॅटिंग सुरु होती. बांगलादेशने भारतासमोर 225 धावांचे आव्हान ठेवले. यावेळी भारताच्या डावाच्या 34 व्या ओव्हरमध्ये बांगलादेशची स्पिनर नाहिदा अख्तरने हरामनप्रीतला स्लिपमध्ये कटआऊट केल्यावर कौरने तिच्या बॅटने विकेट मारून बाद झाल्यानंतर निराशा व्यक्त केली होती. तसेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान देखील भारताची कर्णधार हरमनप्रीतने बांगलादेशच्या अंपायरींगवर प्रश्न उपस्थित करून टीका केली. या कृतीमुळेच तिच्यावर आयसीसीने कारवाई करून दंड ठोठावला आहे.
कोणती कारवाई झाली? हरमनप्रीत कौरला आयसीसीच्या आचारसंहितेचे 2 वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे पुढील 2 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. हरमनप्रीत कौरने तिच्या बॅटने विकेट मारून बाद झाल्यानंतर निराशा व्यक्त केल्या प्रकरणी तिच्यावर लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि तिला शिस्तभंगावरुन 3 डिमेरिट गुण मिळाले आहेत. तसेच अंपायरच्या निर्णयावर हरमनप्रीतने असहमत दर्शवले होते आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सार्वजनिक टीका केली होती यावर आयसीसीने नापसंती दर्शवली. यासाठी हरमनप्रीतला लेव्हल 1 गुन्ह्यासाठी तिच्या मॅच फीच्या 25 टक्के अतिरिक्त दंड देखील ठोठावण्यात आला आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने गुन्हाची कबुली दिली असून अंपायर अख्तर अहमद यांनी प्रस्तावित केलेल्या निर्बंधांना सहमती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरवर करण्यात आलेल्या कारवाईची त्यामुळे माहिती आयसीसीने त्यांच्या अधिकृत अकांऊंटवरून दिली आहे.