Prithvi Shaw
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा विक्रम मोडणाऱ्या पृथ्वीचा(Prithvi Shaw Birthday) आज वाढदिवस आहे. 9 नोव्हेंबर 1999 मध्ये जन्मलेल्या पृथ्वीने पदार्पणाच्या पहिल्या टेस्ट सामन्यातच शतक झळकावत क्रिकेट जगतात आपली मोहर उमटवली. मात्र लहान वयात एवढी मोठी खेळी खेळणे कुणालाही सोपे नाही. ज्या मुलाने वयाच्या चौथ्या वर्षी आईचे छत्र हरपले. पण आईच्या पश्चात त्याचे वडील पंकज शॉ यांनी त्याला कधीच कोणतीच उणीव भासू दिली नाही. टीम इंडियाचा हा ‘वंडर बॉय’ (Wonder Boy) आज आपला 22 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ता जाणून घेऊया त्याच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी… पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पृथ्वीची सर्वत्र स्तुती केली, पण आज या जागी पोहचण्यासाठी पृथ्वी आणि त्याच्या नजीकच्या माणसांनी खासकरून त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. 2018 वर्ष पृथ्वीसाठी बर्याच कारणांसाठी संस्मरणीय राहीले कारण यावर्षी त्याने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ सुरू केलीच नाही तर बर्याच विक्रमांनाही गवसणी घातली. पृथ्वीचे वडील पंकज शॉ (Pankaj Shaw) मूळचे बिहारमधील गया जिल्ह्यातील मानपूर गावचे आहेत. पण पृथ्वीचा जन्म मुंबईच्या विरार भागात झाला आणि त्याचा बिहारशी काही संबंध नाही. सध्या पृथ्वीचे वडील पंकज हेसुद्धा मुंबईत राहत आहेत. पृथ्वीच्या जन्मापूर्वीच ते मुंबईत शिफ्ट झाले आणि इथे त्यांनी कपड्यांचे दुकान काढले. पृथ्वीला आज अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू बनवण्यामागे त्याच्या वडिलांनी कठीण परिश्रम केले. वयाच्या अवघ्याचार वर्षाचा असताना पृथ्वीने त्याची आई गमावली. पृथ्वीचे वडील पंकज यांना हा मोठा धक्का होता. पत्नीचे निधन झाल्यानंतर पंकज यांनी पृथ्वीला क्रिकेट अकादमीमध्ये बसवले आणि मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर व्यतीत केले. पृथ्वीच्या वडिलांनी कपड्यांचे दुकान उघडले होते, जे सूरत आणि बडोदा पर्यंत लोकप्रिय झाले होते. मात्र, पृथ्वीचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न सत्यात करण्यासाठी पंकज यांनी त्यांचे दुकान विकले. 1999 मध्ये जन्मलेला पृथ्वी 2003 च्या हैरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट (Harris Shielf Tournament) दरम्यान पाहिलांदा चर्चेत आला. 14 वर्षीय पृथ्वीने रिजवी स्प्रिंगफील्डसाठी खेळात सेंट फ्रांसिस डी’एस्सीविरुद्ध सामन्यात 330 चेंडूत 546 धावा केल्या. या सामन्यादरम्यान पृथ्वीने 85 चौकार आणि 5 षटकारही लागले. मात्र, शॉच्या या कामगिरीवर त्याचे वडीन नाराज होते. याचा उल्लेख त्याने एका मुलाखतीत केला आहे. वडिलांच्या नाराजीचे कारण म्हणजे पृथ्वी नाबाद परतला नाही. या खेळीनंतर सचिन तेंडुलकरही पृथ्वीचा चाहता झाला आणि त्याने त्याला बॅट भेट म्हणून दिली.
2016 मध्ये पृथ्वीला भारताच्या अंडर-19 संघात स्थान मिळाले. या संघाने श्रीलंकेत आशिया कप जिंकला होता. दोन महिन्यांनंतर, त्याने तामिळनाडूविरुद्धच्या उपांत्य फेरीत मुंबईसाठी रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दुसऱ्या डावात शतक झळकावून आपल्या संघाला विजयाकडे नेले. 2 वर्षांनंतर, पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला. त्याच स्पर्धेदरम्यान, त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने आयपीएल लिलावात तब्बल 1.2 कोटी रुपयांना विकत घेतले. तेव्हापासून पृथ्वीने मागे वळून पाहिले नाही.
त्याला 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉने शतक झळकावले. पदार्पणाच्या कसोटीत शतक करणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला. तेव्हा शॉचे वय १८ वर्षे ३२९ दिवस होते. तसे, कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय सचिन तेंडुलकर आहे. त्याने १७ वर्षे १०७ दिवसांत इंग्लंडविरुद्ध शतक केले.